मंचर महावितरणचे पथक पूरग्रस्त भागात दाखल
मंचर – मंचर विभागाच्या महावितरण कंपनीचे अभियंते आणि जनमित्र यांनी हातकणंगले तालुक्यातील पूरग्रस्त हळोंदी आणि भाडोळे (ता. हातकणंगले) गावातील 1 हजार 745 घरगुती वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केल्याची माहिती मंचर महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खांडेकर यांनी दिली.
अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांनी पूरग्रस्त भागात मदत करण्यासाठी मंचर विभागातून 2 अभियंते आणि 8 जनमित्रांचे पथक पाठविले. त्यानंतर पुन्हा बुधवारी (दि. 14) दोन अभियंते मकरंद आवारे आणि दत्तात्रय जाधव आणि 9 जनमित्र संपत जोशी, दिलीप बांबळे, प्रशांत मोरे, देविदास गव्हाळे, दिलीप सोळंकी, सीताराम भवारी, संतराम बनसोड, मनोज गाढवे, विनायक टेंभेकर यांचे पथक कोल्हापूर येथे रवाना झाले आहे. कोल्हापूर येथील पूरग्रस्त भागात काम करीत असताना हलोंडी, भादुले, भाडोळे, बेंडवडे या गावांतील पूरामध्ये बुडून गेलेले 4 रोहित्र सुरू करुन वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.