भोर – मराठी मातृभाषा नसली तरीही ती मॉरिशसवासीयांना आपली वाटते. येथील प्रत्येकाला मराठी भाषेचा अभिमान आहे, असे प्रतिपादन मॉरिशसचे कला व सांस्कृतिक मंत्री पृथ्वीराजसिंह रुपन यांनी केले.
मराठी भाषक संघ, नागपूरचे संथागार फाउंडेशन आणि अनंतराव थोपटे महाविद्यालय भोर यांच्या संयुक्त विद्यमाने मॉरिशस येथील मोका शहरातील महात्मा गांधी संस्थेच्या सुब्रमनिआ हॉलमध्ये पहिले आंतरराष्ट्रीय फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसारक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन रुपन यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू नागनाथ कोतापल्ले, संमेलनाचे अध्यक्ष डॉ. मनोहर जाधव, स्वागताध्यक्ष आबासाहेब थोरात, मॉरिशस मराठी फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. बोदन आबा, उपाध्यक्ष असले ईततू, जयनारायण मितू, समन्वयक प्रा. डॉ. रोहिदास जाधव, अनंतराव थोपटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख, डॉ. प्रदीप पाटील, अंनिसचे पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण बुरांडे, ज्ञानोबा घोणे यांच्यासह मॉरिशसचे नागरिक उपस्थित होते.
यावेळी डॉ. रोहिदास जाधव व डॉ. संदीप कांबळे यांनी संपादित केलेल्या फुले, शाहू, आंबेडकर विचारांची विश्वव्यापकता या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. दुसऱ्या सत्रात शाहु, फुले, आंबेडकर विचारांचे वैश्विक अवकाश या विषयावर परिसंवाद झाला.
यावेळी डॉ. बिदन आबा, डॉ. प्रदीप पाटील, सोना धुमिया, धनीबाई शोकिया, लक्ष्मीबाई बाबाजी, डॉ. सुलभा पाटोळे, डॉ. होमराजन गौदिया, डॉ. देवीदास गायकवाड सहभागी झाले होते. तिसऱ्या सत्रात कवी संमेलन सुरेश साबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांच्या भाषणाने संमेलनाचा शेवट झाला.