करोना बाधितांवरील उपचारासाठी पालिकेला हवे मनुष्यबळ
पुणे – शहरात करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर भार येत असून पालिकेस रुग्णांवर उपचारासाठी डॉक्टरांची तातडीची आवश्यकता आहे. ही बाब लक्षात घेऊन दी अर्बन लर्निंग इंटरशिप प्रोग्राम (टूलिप) अंतर्गत सुमारे 150 डॉक्टरांची नेमणूक केली जाणार आहे. अतिरिक्त आयुक्त डॉ. रूबल अग्रवाल यांनी ही माहिती दिली. त्यासाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून डॉक्टरांचे अर्ज मागवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शहरात 9 मार्च रोजी पहिला करोनाबाधित रुग्ण आढळून आला. त्यानंतर संख्या 11 हजारांवर गेली आहे. तर, प्रत्यक्षात 4 हजार जणांवरच उपचार सुरू असले तरी, या रुग्णांच्या संपर्कात आलेले सुमारे 2 ते 3 हजार जण दर दिवशी विलगीकरणात ठेवले जातात. त्यामुळे दररोज सरासरी 6 हजार जणांवर वैद्यकीय लक्ष ठेवावे लागत आहे. त्यासाठी महापालिकेकडे आवश्यक यंत्रणा असली तरी प्रत्यक्षात डॉक्टरांची कमतरता आहे. त्यामुळे 1 हजार वैद्यकीय पदे भरण्यासाठी प्रयत्न केले होते.