खेड, हवेली, मुळशी आणि मावळ तालुक्यातील 44 गावांत भूसंपादन
पुणे –पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या रिंगरोडची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार या रिंगरोडचा बहुतांश भाग हा पुणे-पिंपरी चिंचवड शहरालगत आहे. खेड, हवेली, मुळशी आणि मावळ या चार तालुक्यातील 44 गावांमधून हा रिंगरोड जाणार आहे. या रिंगरोडवर 15 उड्डाणपूल, दोन रेल्वे मार्गावर उड्डाणपूल आणि पाच बोगदे प्रस्तावित करण्यात आले आहे.
पीएमआरडीएने प्रादेशिक विकास आराखड्यातील रिंगरोड विकसित करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला. एकूण 128 किमी लांबीचा हा रिंगरोड होता. पहिल्या टप्प्यात तो 90 मिटर रुंदीचा होता. परंतु मध्यंतरी एमएसआरडीसीच्या रिंगरोडप्रमाणेच तो 110 रुंदीचा करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा रिंगरोड 1987 च्या प्रादेशिक आराखड्यातील आहे. दरम्यानच्या कालावधीत या रस्त्यावर अनेक ठिकाणी बांधकामांना परवानगी देण्यात आल्या. त्यामुळे भूसंपादन करताना अनेक अडचणी येणार असून खर्च देखील वाढण्याची शक्यता आहे. तसेच या रिंगरोडपासून 15 किलोमीटर अंतरावरूनच एमएसआरडीसीचा सुमारे 110 रुंदीचा रिंगरोड जाणार आहे.
त्यामुळे एवढ्या कमी अंतरावरून जाणारे हे दोन्ही रस्ता एकाच रुंदीचे करणे योग्य होणार नाही,त्यामुळे रिंगरोडची रुंदी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 65 मीटर रुंदीचा रिंगरोड करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार नव्याने रिंगरोडचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी पीएमआरडीएकडून सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली. या कंपनीकडून रिंगरोड सर्व्हेक्षण पूर्ण केले आहे.
या रिंगरोडसाठी सुमारे 17 हजार 412 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता मिळाली आहे. त्यापैकी रिंगरोडच्या भूसंपादनासाठी सुमारे 5 हजार 800कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
* पीएमआरडीएच्या रिंगरोडची एकूण लांबी 128 कि.मी
* एमएसआरडीकडे हस्तांतरित केलेला रिंगरोड लांबी-40 कि.मी
* पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित रिंगरोड लांबी-5.70 कि.मी
* पीएमआरडीएकडील रिंगरोडची लांबी-82.38कि.मी