भोपाळ – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे सातव्या आंतरराष्ट्रीय धर्म-धम्म परिषदेचे उद्घाटन केले. इंडिया फाउंडेशनने सांची युनिव्हर्सिटी ऑफ बुद्धिस्ट-इंडिक स्टडीजच्या सहकार्याने ‘ईस्टर्न ह्युमॅनिझम फॉर द न्यू एरा’ या थीमसह ही तीन दिवसीय परिषद आयोजित केली आहे.
धर्म-धम्म परंपरेतील धार्मिक, राजकीय विचारवंत नेत्यांना एकत्र आणण्याचा या परिषदेचा उद्देश आहे. उदयोन्मुख नवीन जागतिक व्यवस्थेसाठी तात्विक फ्रेमवर्क तयार करण्यावर विचार करा, असे आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केले. परिषदेच्या उद्घाटन सत्रात 45 वक्ते असतील, मंत्र्यांचे सत्र, मुख्य सत्र आणि पाच पूर्ण सत्रांमध्ये विविध उप-विषयांवर परिषदेत चर्चा केली जाईल, तसेच 15 सत्रांमध्ये भारत आणि परदेशातील तज्ज्ञांचे 115 पेपर सादर केले जाणार आहेत.
या परिषदेत पंधरा देश सहभागी होत आहेत. इंडिया फाऊंडेशन ही नवी दिल्लीस्थित स्वतंत्र थिंक टॅंक आहे जी भारतीय राजकारणातील समस्या, आव्हाने आणि संधी यावर लक्ष केंद्रित करते.