ऑगस्ट महिन्यात व्रत आणि सणांची रेलचेल असते. वास्तविक यंदा ऑगस्ट महिन्यात अनेक महत्त्वाचे व्रत आणि सण येत आहेत. ऑगस्ट महिन्याची सुरुवात नागपंचमीपासून होईल आणि यासोबतच मंगळागौरी,पुत्रदा आणि भागवत एकादशी, भारताचा स्वातंत्र्यदिन, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी यांसारखे महत्वाचे सण साजरे होणार आहे.
या महिन्यात श्रावणी पौर्णिमेला श्रावण महिना संपेल आणि भाद्रपद महिना सुरू होईल. ऑगस्ट महिन्यात दोन एकादशी देखील आहेत – पुत्रदा एकादशी आणि भागवत एकादशी. या महिन्यात स्त्रिया पाळतात ते कजरी तीज व्रत रविवार, 14 ऑगस्ट रोजी आहे. चला तर मग जाणून घेऊया आॅगस्ट महिन्यात कुठले-कुठले महत्त्वाचे सण आणि उत्सव आहेत.
ऑगस्ट 2022 महिन्यातील व्रत आणि सण खालीलप्रमाणे –
1 ऑगस्ट (सोमवार) , विनायक चतुर्थी, श्रावणी सोमवार(शिवपूजन शिवामूठ- तांदूळ)
2 ऑगस्ट (मंगळवार) नागपंचमी
8 ऑगस्ट (सोमवार) पुत्रदा एकादशी, श्रावणी सोमवार(शिवपूजन शिवामूठ – तीळ)
9 ऑगस्ट (मंगळवार) मोहरम, भौमप्रदोष, मंगलागौरी पूजन
11 ऑगस्ट (गुरुवार) नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन
12 ऑगस्ट (शुक्रवार) वरदलक्ष्मी व्रत (जरा-जिवंतिका पूजन)
14 ऑगस्ट (रविवार) कजरी तीज व्रत, आदित्य पूजन
15 ऑगस्ट (सोमवार) स्वातंत्र्य दिन,पतेती, संकष्टी चतुर्थी
17 ऑगस्ट (बुधवार) बुधपूजन
18 ऑगस्ट (गुरूवार) श्रीकृष्ण जयंती(उपवास), बृहस्पती पूजन
19 ऑगस्ट (शुक्रवार) गोपळकाला, कालाष्टमी, जरा-जिवंतिका पूजन, श्री ज्ञानेश्वर महाराज जयंती
22 ऑगस्ट (सोमवार) अजा स्मार्त एकादशी
23 ऑगस्ट (मंगळवार) भागवत एकादशी
24 ऑगस्ट (बुधवार) प्रदोष व्रत (कृष्ण), पर्युषण पर्वारंभ
25 ऑगस्ट (गुरुवार) मासिक शिवरात्री, गुरूपुष्यामृतयोग
26 ऑगस्ट (शुक्रवार) पोळा
30 ऑगस्ट (मंगळवार) हरितालिका तृतीया, स्वणगौरी व्रत,सामश्रावणी
31 ऑगस्ट (बुधवार) श्री गणेश चतुर्थी
2 ऑगस्ट, मंगळवार (नागपंचमी) : नागपंचमी हा श्रावण महिन्यातला पहिला वहिला आणि सर्व महिला, मुली ह्यांना हवाहवासा वाटणारा सण. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या दिवशी, 2 ऑगस्टला नागपंचमी आहे. 2 ऑगस्ट 2022 ही श्रावण महिन्याची शुक्ल पक्ष पंचमी तिथी आहे. भारतीय परंपरेनुसार या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. नागपंचमीला मातीच्या नागाची किंवा नागाच्या चित्राची पूजा केली जाते. नागपंचमी हा खरे तर निसर्गाशी नाते जोडणारा सण आहे. या दिवशी भूतदया मंत्र जपण्याचा आणि प्राण्यांवर प्रेम करण्याचा संदेश देण्यात येतो.
8 ऑगस्ट,सोमवार (पुत्रदा एकादशी) : श्रावण महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी एकादशी पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते. या वर्षी सोमवार, 8 ऑगस्ट 2022 रोजी पुत्रदा एकादशी साजरी केली जाणार आहे. पुत्रप्राप्ती व्हावी, या हेतूने भगवान विष्णूचे पूजन या दिनी केले जाते. जे दाम्पत्य या दिवशी मनोभावे श्रीविष्णूचे पूजन करतात, त्यांना पुत्रप्राप्तीच्या प्रयत्नात यश येते, असे पुराणात सांगितले गेले आहे.
9 ऑगस्ट, मंगळवार,(मोहरम) : मोहरम हा एक मुस्लिम सण आहे. इस्लामनुसार मोहरम हा वर्षारंभ आहे. मोहरम याचा अर्थ “निषिद्ध, धिक्कार करण्यासारखा” असा आहे.
11 ऑगस्ट, गुरुवार, (रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा) : 11 ऑगस्ट 2022 रोजी श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी रक्षा बंधन साजरे केले जाईल. याला श्रावणी पौर्णिमा असेही म्हणतात. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा हा सण भारतीय सनातन परंपरेची ओळख आहे. श्रावणी सणाच्या दिवशी, प्राचीन काळी, ब्राह्मण, पुरोहित आणि आचार्य त्यांच्या यजमानांना संरक्षक धागे बांधत आणि त्यांच्याकडून धर्म आणि शास्त्रांचे रक्षण करण्याचे वचन घेत. तेव्हापासून ही परंपरा सुरू असल्याचे मानले जाते.
श्रावणी पौर्णिमेला जसे नारळी पौर्णिमा म्हणतात, तसे राखी पौर्णिमासुद्धा म्हणतात. कोळीबांधवांमध्ये नारळी पौर्णिमेला फार महत्त्वाचे स्थान आहे. या दिवशी कोळीबांधव श्रीफळ वाजतगाजत नेऊन सागराला अर्पण करतात आणि सागराला प्रसन्न करून कृपादृष्टीसाठी विनवणी करतात.
12 ऑगस्ट (शुक्रवार) वरदलक्ष्मी व्रत : वरदलक्ष्मीचे व्रत दक्षिण भारतातील तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेशातील गृहिणी वरदलक्ष्मीची पूजा मोठ्या भक्तिभावाने करतात. देशभराच्या विविध भागात हे व्रत विविध नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रात वरदलक्ष्मी व्रत नावाने लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते.
14 ऑगस्ट, रविवार, कजरी तीज : पंचांगानुसार, कजरी तीजचा सण भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तिसऱ्या तिथीला म्हणजेच रविवार, 14 ऑगस्ट 2022 रोजी साजरा केला जाईल. विवाहित महिलांसाठी हा सण महत्त्वाचा मानला जातो. विवाहित स्त्रिया या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि वैवाहिक जीवनाच्या सुखासाठी निर्जला व्रत करतात.
15 ऑगस्ट (सोमवार) स्वातंत्र्य दिन : 15 ऑगस्ट हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत ब्रिटिश राजवटीपासून मुक्त झाला आणि स्वतंत्र राष्ट्र बनला. तेव्हापासून, भारतीय हा दिवस “स्वातंत्र्य दिन” म्हणून मोठ्या थाटामाटात आणि आनंदाने साजरा करतात. 15 ऑगस्ट हा भारताच्या अभिमानाचा आणि सौभाग्याचा दिवस आहे. हा सण म्हणजे आपल्या हृदयात नवी ऊर्जा, नवी आशा, उत्साह आणि देशभक्तीचा संचार असतो.
19 ऑगस्ट, शुक्रवार, गोकुळाष्टमी : श्रावण वद्य अष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी. या अष्टमीला गोकुळाष्टमी, जन्माष्टमी, कृष्णाष्टमी अशी अनेक नावे आहेत. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णांचा जन्म भाद्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला झाला होता, म्हणून ही शुभ तिथी भगवान श्रीकृष्णाची जयंती म्हणून साजरी केली जाते. भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान असलेल्या मथुरेत हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
25 ऑगस्ट (गुरुवार) गुरूपुष्यामृतयोग : गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी ‘गुरुपुष्यामृत’ योग असतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी केल्याच त्याची वृद्धी होते अशी मान्यता आहे. मात्र हा योग शुभ असला, तरी या दिवशी विवाह करत नाहीत. खरेदी आणि गुंतवणुकीशी संबंधित कोणतेही काम करण्यासाठी हा मोठा योग आहे.
26 ऑगस्ट (शुक्रवार) पोळा : श्रावणी अमावास्या म्हणजे बैलपोळा. बारा मास ज्याच्या जिवावर शेतकरी शेतीतून पीक काढतो, तो शेतकऱ्यांचा सोबती बैल. या दिवशी बैलाला सजवून, त्याची पूजा करून मिरवणुकीने मारुतीच्या देवळात नेतात. पोळा हा सण पूर्णपणे ग्रामीण भागातला आहे. याच अमावास्येला पिठोरी अमावास्या असेही म्हणतात.
30 ऑगस्ट, मंगळवार, हरितालिका : हरितालिका व्रत हे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला 30 ऑगस्ट, मंगळवारी केले जाते. काजरी तीजप्रमाणे या व्रतामध्येही भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. हिंदू धर्मात अशी श्रद्धा आहे की देवी पार्वतीने भगवान भोलेनाथला आपला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हरितालिका तीजचे व्रत केले.
31 ऑगस्ट, बुधवार, गणेश चतुर्थी : गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला म्हणजेच 31 ऑगस्ट, बुधवारी साजरी केली जाईल. देशभरात गणेशोत्सव पूर्ण 10 दिवस साजरा केला जातो. असे मानले जाते की या दिवशी गणपती बाप्पा आपल्या घरी आणल्याने ते आपल्या भक्तांचे सर्व अडथळे आणि अडथळे दूर करतात.
मंगळागौरी व्रत : श्रावणातील मधुमंगल सोहळा म्हणजे मंगळागौरीचे व्रत. मंगळागौर ही पारंपरिक सौभाग्यदायी देवता मानली जाते. गौरी म्हणजे पार्वती. नववधू पहिली पाच वर्षे श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीची पूजा करते. सुखी वैवाहिक जीवनासाठी, श्रावणातील मंगळवारी मंगळागौरी व्रत ठेवले जाते. 2022 मध्ये 02 ऑगस्ट , 09 ऑगस्ट, 16 ऑगस्ट आणि 23 ऑगस्ट मंगळागौरीव्रत आहे. ज्यांना आपल्या वैवाहिक जीवनात अडचणी येत आहेत, संतती सुखाची इच्छा आहे, त्यांनी श्रावण महिन्यात माता मंगळा गौरीचे व्रत अवश्य करावे आणि विधिवत पूजा करावी आणि आपल्या समस्यांपासून मुक्तीसाठी प्रार्थना करावी.
श्रावणी सोमवार – शिवपूजन (शिवामूठ) : श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहिले जाते. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या तीळ, तिसऱ्या मूग, चौथ्या जवस वाहिले जाते. प्रत्येक सोमवारी 108 बेलाची पाने शिवपिंडीवर वाहिली जातात. 108 पाने न मिळाल्यास 7,9,11अशी बेलाची पाने वाहतात.