म्युन्सी (इंडियाना, अमेरिका) – अमेरिकेत 6 वर्षाच्या लहानग्याने बंदुकीतून गोळी झाडून आपल्याच 5 वर्षांच्या धाकट्या बहिणीची हत्या केल्याची विचित्र आणि धक्कादायक घटना घडली आहे. पूर्वेकडील इंडियाना प्रांतात ही घटना घडली आहे. या प्रकरणी या मुलाच्या पालकांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणातील मुलगी घरातच डोक्यात गोळी लागल्यामुळे मरण पावली असल्याचे मंगळवारी दुपारी आढळून आले होते. तिला लगेचच रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तिला मृत घोषित करण्यात आले, असे एका वर्तमानपत्राने म्हटले आहे.
या मुलीच्या 6 वर्षांच्या मोठ्या भावाने सेफमध्ये ठेवलेल्या दोन बंदुकांपैकी एक बाहेर काढली आणि आपल्या बहिणीवर गोळी झाडली, असे या मुलाच्या पित्याने पोलिसांना सांगितले. जेकॉब ग्रेसन असे या पित्याचे नाव आहे. जेकॉब आणि त्यांची पत्नी केंबर्ली ग्रेसन यांना निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत झाल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर निष्काळजीपणाचे तीन अन्य आरोप ठेवण्यात आले आहेत.
बंदुक ज्या सेफमध्ये ठेवलेली होती, त्याची किल्ली आपल्या पालकांच्या बेडरूममध्ये मिळाली. आई झोपली असताना आपण त्या किल्ल्या मिळवल्याचे मुलाने पोलिसांना सांगितले. जेकॉब आणि किंबर्ली हे आपल्या मुलाला शॉटगन कशी चालवायची हे शिकवण्यासाठी शुटिंग रेंजवर घेऊन जात असत. त्यामुळे बंदुक मिळवण्यासाठी आपल्या मुलाने यापूर्वीही सेफ उघडली होती, असे पालकांनी पोलिसांना सांगितले.