प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 12 -महापालिकेच्या स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाची इमारात अखेर महापालिकाच बांधणार आहे. डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या आवारात ही इमारत बांधण्यात येणार असून, त्यासाठी 147 कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
महापालिकेकडून हे महाविद्यालय “पीपीपी’ तत्वावर बांधण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यामुळे झालेला उशीर आणि महाविद्यालयाचे पहिले वर्षे सुरू झाल्याने पुढील वर्षासाठी एकाच ठिकाणी सर्व सुविधा उभारणे आवश्यक असल्याने पालिकेकडूनच ही महाविद्यालयाची इमारत पुढील दीड वर्षात बांधली जाणार आहे. दरम्यान, या ठिकाणी असलेले महापालिकेचे डॉ. नायडू सांसर्गिक रूग्णालय बाणेर येथे करोनाकाळात महापालिकेने उभारलेल्या रुग्णालयाच्या ठिकाणी स्थलांतरित केले जाणार असून,त्यासही मान्यता दिल्याचे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.
महापालिकेतर्फे मागील वर्षी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यासाठीचे पहिल्या वर्षाचे वर्ग मंगळवार पेठेतील कमला नेहरू रूग्णालयाच्या जवळ असलेल्या सणस शाळेत सुरू करण्यात आले असून, या महाविद्यालयाचे वसतिगृह सणस मैदानातील क्रीडा विभागाच्या वसतिगृहात सुरू करण्यात आले आहे.
पालिकेने महाविद्यालयाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव देताना नायडू रुग्णालयाच्या आवारातच नवीन इमारत बांधून याच ठिकाणी मोठे हॉस्पिटल तसेच वसतिगृह उभारण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे पालिकेस आता हे काम सुरू करावे लागणार असल्याने पालिकेने स्वत:च बांधकामाचा निर्णय घेतला आहे
हॉस्टेल आणि हॉस्पिटल “पीपीपी’वर
महाविद्यालयाची इमारत महापालिका बांधणार असली तरी, या ठिकाणी हॉस्टेल तसेच 500 बेडचे हॉस्पिटल भविष्यात “पीपीपी’वर उभाण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले. त्या अंतर्गत हॉस्पिटल आणि हॉस्टेलचे बांधकाम करून देणाऱ्यांनाच ते चालविण्यास दिले जाईल. त्याबाबत जास्तीत जास्त चांगला पर्याय शोधून महापालिकेचेही नुकसान होणार नाही, अशा पद्धतीने निर्णय घेतला जाणार असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले.