मुंबई – मुंबईच्या कुर्ला उपनगरातील नाईक नगर सोसायटीतील एक इमारत काल मध्यरात्री कोसळून झालेल्या दुर्घटनेत 14 जण ठार तर 13 जण जखमी झाले आहेत. जखमींना घाटकोपरच्या सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्या खाली आणखी काहीं जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून तेथे त्यांचा शोध घेण्याचे काम आज उशिरापर्यंत सुरू होते.
इमारतीचा ढिगारा हलवण्याचे काम अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकांकडून सुरू आहे. ढिगाऱ्या खाली काही माणसे जीवंत गाडली गेल्याची शक्यता असल्याने ढिगारा हलवण्याचे काम काळजीपुर्वक करण्याची सुचना महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी संबंधीत यंत्रणांना केली आहे.
ज्या इमारतीत ही पडझड झाली, त्याच इमारतीची दुसरीही विंग कोसळण्याच्या बेतात असल्याचे तेथील निरीक्षणानंतर आढळून आले असून त्यातील लोकांना आधीच अन्यत्र हलवण्यात आले आहे.