भीषण अपघात! सांगोल्यात ट्रकच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू; १३ जण गंभीर जखमी

पंढरपूर : भरधाव मालट्रकने ओमनी कारला समोरुन जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कार चालकासह तिघेजण जागीच ठार झाले. तर कारमधील लहान मुले, महिला, पुरुष असे 13 जण जखमी झाले . हा अपघात सांगोला – मिरज रोड वरील करांडेवाडी उड्डाणपुलाजवळील सर्विस रोडवर घडला.

कारचालक दाजीराम लक्ष्मण शिंगाडे (42 रा.उदनवाडी ता.सांगोला) ,कावेरी मनोज हरीजन( 7 रा.निरलगी ता.ताळेकोटी जि.विजापूर) व गुड्डी चंद्रकांत मगिरी (8 रा.कोंडगोडी ता.जेवरगी जि.गुलबर्गा) अशी ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. तर मनोज महादेव आप्पा हरीजन (40),भारती मनोज हरीजन (30 दोघेही रा.निरलगी ता.ताळेकोटी जि.विजापूर) , मानतेश मगिरी-32 ,चंद्रकांत दुराण्णाप्पा मगिरी(25), ताराबाई चंद्रकांत मगिरी -(30), अंबिका मानतेश मगिरी (28) ,मुत्तूराम चंद्रकांत मगिरी (2), चिन्नू चंद्रकांत मगिरी (5), दिपा मानतेश दुराण्णाप्पा मगिरी (16), लक्ष्मी चंद्रकांत मगिरी (6), कृष्णात शिवाप्पा मगिरी (30 सर्वजण रा.कोंडगोडी ता.जेवरगी जि.गुलबर्गा) , शरणू हिरगप्पा मगिरी (28) व परशू शरणाप्पा चलवादी (28) रा. वारणानगर जि. कोल्हापूर अशी जखमींची नावे आहेत.

उदनवाडी येथील चालक दाजीराम लक्ष्मण शिंगाडे याने उदनवाडी येथून 3 पुरुष, 3 महिला, 6 लहान मुले असे 11 लोकांना ओमनी कारमध्ये घेवून सिंदगी (कर्नाटक)निघाले होते. त्यांची कार करांडेवाडी फाटा उड्डाणपुलाजवळ उजव्या बाजूस असणाऱ्या सर्विस रोडने जात असताना समोरुन भरधाव येणा-या एम एच -13-सीयु -6086 या माल ट्रकने कारला समोरुन जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.

अपघात इतका भीषण होता की कार चालक दाजीराम शिंगाडे याचा डावा व उजवा पाय गुडघ्यापासून खाली तुटल्याने जागीच ठार झाला. तर कारमधील कावेरी हरिजन हिच्या डोक्याला पाठीमागील बाजूस व तोंडावर गंभीर मार लागला होता. तिला तात्काळ उपचाराकरता सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या गुड्डी मगिरी हिला उपचाराकरिता पंढरपूरला घेऊन जात असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.

उर्वरीत जखमींना रुग्णवाहिकेतून उपचाराकरता ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातात कारचा चक्काचूर झाला असून अपघात घडताच चालक ट्रक जागेवर सोडून पळून गेला. याबाबत ,माणिक लक्ष्मण शिंगाडे रा.उदनवाडी यांनी मालट्रक चालकाविरुध्द फिर्याद दाखल केली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले करीत आहेत

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.