नवी दिल्ली – चलन बाजारात भारतीय रूपयाचे पुन्हा अवमुल्यन झाले असून रूपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत 78 रूपये 59 पैसे इतकी झाली आहे. रूपयाची ही आणखी एक नीचांकी पातळी आहे. इक्विटीमधील विदेशी गुंतवणूकदारांची विक्री, वाढत्या महागाईचा दबाव आणि जागतिक पातळीवरील कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे रूपयाची ही घसरण झाल्याचे सांगितले जात आहे.
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती पुन्हा एकदा महागाईच्या आघाडीवर चिंता निर्माण करणाऱ्या ठरल्या आहेत. ज्यामुळे रिझर्व्ह बॅकेला पुन्हा व्याजदरात वाढ करावी लागण्याची शक्यता आहे. त्यातून भारतात मंदी सदृश वातावरण निर्माण होण्याचीही शक्यता आहे.
काही तज्ज्ञांच्या मते नजिकच्या काळात तरी भारतीय रूपयाचे मुल्य वाढण्याची शक्यता नाही. या वर्षाच्या अखेरीला भारतीय रूपयाचे मुल्य 80 ते 81 रूपयांपर्यंत पोहचू शकते असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. रिझर्व्ह बॅंकेकडील परकीय चलन गंगाजळीही सातत्याने घटत आहे. 17 जून रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठाही 5.87 अब्ज डॉलरने घसरून 590.588 अब्ज डॉलर्स इतका झाला आहे.