जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्गमधील सोवेटो गावातल्या एका बारमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये किमान 14 जण ठार झाले आहेत. तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मिनीबस, टॅक्सीमधून आलेल्या काही जणांनी बारच्या सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केला, असे पोलिसांनी सांगितले. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. पोलिसांनी रविवारी सकाळी बारमधील मृतदेह हलवले आणि या सामुदायिक हत्याकांडाचा तपास सुरू केला.
घटनास्थळी मोठ्या गोळीबाराच्या खुणा सापडल्या असल्यामुळे गोळीबार करणारे अनेकजण असावेत असा अंदाज आहे, असे गौतेंग प्रांताचे पोलिस आयुक्त लेफ्टनंट जनरल इलियास मावेला यांनी सांगितले.
अचानक गोळीबाराचे मोठे आवाज ऐकू आले. त्यानंतर अनेक जण बारच्या बाहेर पळून जाऊ लागले होते, असे बारमध्ये त्यावेळी उपस्थित असलेल्या काही जणांनी सांगितले. मात्र गोळीबार नक्की कोणी आणि का केला, हे समजू शकलेले नाही.
गोळीबारासाठी उच्च श्रेणीच्या बंदुकांचा वापर केला गेला असावा. गोळीबारासाठी निश्चित लक्ष्य ठरवलेले नव्हते. हल्लेखोर स्वैर गोळीबार करत होते, असे मावेला यांनी सांगितले.