सातारा – लंपी स्किनमुळे शुक्रवारी एका दिवसात 14 जनावरांचा मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर वगळता दहा तालुक्यातील लंपी स्किन रोगाची लागण झाली आहे. शुक्रवारअखेर 1652 जनावरे बाधित आढळली असून एकूण 119 जनावरांचा मृत्यू झाला आहे. नियमित औषधोपचाराने 335 जनावरे बरी झाल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ. अंकुश परिहार व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली. शुक्रवारअखेर 1472 गाय, 180 बैल अशा 1652 जनावरांना लंपी स्किनचा प्रादुर्भाव झाला आहे. शुक्रवारअखेर 87 गायी, 32 बैल असे 119 पशुधन मृत झाले आहे. जिल्ह्यात आजअखेर 3 लाख 40 हजार 863 पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती डॉ. संजय शिंदे यांनी दिली.