पुसेगाव, दि. 22 (प्रतिनिधी) -कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी 13 कोटी 35 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. ग्रामीण भागासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या सर्व रस्त्यांची सुधारणा आवश्यक असल्याने केलेल्या पाठपुराव्यास यश आले असल्याची माहिती, आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली आहे.
यासंदर्भात आमदार शिंदे यांनी सांगितले, की राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पातून (जुलै 2023) कोरेगाव मतदारसंघातील विविध रस्त्यांसाठी 13 कोटी 35 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये खंडाळा- पळशी- कोरेगाव- रहिमतपूर- मसूर- कऱ्हाड- पलूस- कऱ्हाड- पलूस राज्य मार्ग क्रमांक 142 वरील अंबवडे ते पळशी रेल्वे गेट ते भक्तवडी या भागाच्या लांबीची सुधारणा करण्यासाठी दोन कोटी 80 लाख रुपये, तर राऊतवाडी- खोलवडी- इबाहिमपूर- बनवडी- अंबवडे- पळशी- किन्हई- चिंचणी या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 23 वरील दुधनवाडी फाटा ते अंबवडे या भागाच्या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी दोन कोटी 80 लाख रुपये, वडूथ-
सातारारोड- अंबवडे- किन्हई- अंबवडे- किन्हई ते प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक चार या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 36 वरील किन्हई ते प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक चार या भागाची सुधारणा करण्यासाठी दोन कोटी 75 लाख रुपये आणि कापडगाव- आरडगाव- कापशी- चिलेवाडी- भाडळे- शेंदूरजणे प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक चार वरील हासेवाडी फाटा ते भाडळे या भागाचे रुंदीकरण व सुधारणा करण्यासाठी अडीच कोटी, भुईंज- मालगाव- शिवथर- भीमनगर- पाडळी- शिवथर ते राज्य मार्ग क्रमांक 142 वरील शिवथर रेल्वे गेट ते भीमनगर येथील जिल्हा परिषद शाळा व जरंडेश्वर फाटा ते पाडळी या रस्त्याच्या भागासाठी अडीच कोटी अशा कामांचा समावेश आहे.ही कामे झाल्यानंतर दळणवळण सुलभ होण्यास मदत होणार आहे. भविष्यातही कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून निधी आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले.