पिंपरी, (प्रभात वॉच) – वाहन चालकाशी हुज्जत नको म्हणून शासनाने ऑनलाइन दंड आकारण्यास सुरूवात केली आहे. मात्र ऑनलाइन दंडालाही बेशिस्त वाहन चालक जुमानत नसल्याचे दिसून येते. पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी केलेल्या दंडापैकी १२८ कोटी रुपयांचा दंड अद्याप वाहन चालकांनी भरलेला नाही.
१५ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाली. त्यामुळे वाहतूक पोलिसांचाही कारभार स्वतंत्ररित्या सुरू झाला. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहतूक पोलीस आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांनी संयुक्तरित्या उपाययोजना करण्यास सुरूवात झाली.
पार्किंगसाठी स्वतंत्र पट्टे मारण्यात आले. बेशिस्त दुचाकी वाहन चालकांवर कारवाईसाठी टेम्पो आणि चारचाकी वाहन चालकांवर कारवाईसाठी क्रेनही उपलब्ध करून दिल्या. मात्र बेशिस्त वाहन चालकांवर त्याचा काडीमात्र फरक पडला नाही.
आयुक्तालयाच्या स्थापनेपासून ते २७ मार्च २०२४ अखेर वाहतूक पोलिसांनी तब्बल ४० लाख १४ हजार ७६३ वाहनांवर कारवाई केली आहे. कारवाई केलेल्यांपैकी १४ लाख चार हजार ४०२ वाहन चालकांनी ५५ कोटी ४८ लाख ८४ हजार ९०० रुपयांचा दंड भरला आहे. मात्र अद्यापही २६ लाख १० हजार ३६१ वाहन चालकांकडून १२८ कोटी १७ लाख २१ हजार ७०० रुपयांचा दंड येणे बाकी आहे.
वाहतूक पोलीस सिग्नल जंपिंग, स्टॉप लाइनच्या पुढे वाहन उभे करणे, वाहनाला काळ्या काचा लावणे, फॅन्सी नंबर प्ल्ेट लावणे, टि्रपल सीट आदी बेशिस्त वाहन चालकाचा फोटो काढून त्यानुसार ऑनलाइन दंड आकारण्यात येतो. संबंधित वाहन मालकालाही दंडाची माहिती मोबाइलवर मिळते. मात्र दंड भरण्याकडे वाहन मालक दुर्लक्ष करतात. थकीत दंड वसूलीसाठी वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी विशेष मोहीम राबविण्यात येते. मात्र दिवसेंदिवस थकीत दंडाचे प्रमाण हे वाढतच चालले आहे.
लोकअदालत पोलिसांच्या फायद्याची
वाहन चालकांना दंड करूनही ते भरत नाहीत. लोकअदालतीच्यावेळी वाहतूक पोलीस संबंधित वाहन मालकाला लोकअदालतमध्ये बोलविते. अशावेळी काही वाहन चालक अदालतमध्ये जाण्याची कटकट नको म्हणून अगोदरच दंड भरून टाकतात. मात्र काही वाहन चालक लोकअदालतीमध्येही जात नाहीत. मात्र लोकअदालतमध्ये दंड भरणा–या वाहन चालकांचे प्रमाणही अधिक आहे.
वाहन चालकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी तरी वाहतूकीच्या नियमांचे पालन करावे. मार्च महिन्याच्या सुरूवातीला झालेल्या लोकअदालतीमध्ये अनेक वाहन चालकांनी दंड भरला असून त्यांची संगणकीय नोंद व पावती करणे बाकी आहे. त्यामुळे थकीत रक्कम जादा दिसत आहे. बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई यापुढील काळातही सुरूच राहणार आहे.– विशाल गायकवाड, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा (सिंगल फोटो)
आकडे बोलतात…
एकूण केसेस – ४० लाख १४ हजार ७६३
दंड जमा केलेल्या केसेसची संख्या – १४ लाख ४ हजार ४०२
जमा झालेल्या दंडाची रक्कम – ५५ कोटी ४८ लाख ८४ हजार ९००
दंड जमा न केलेल्या केसेची संख्या – २६ लाख १० हजार ३६१
जमा न झालेल्या दंडाची रक्कम – १२८ कोटी १७ लाख २१ हजार ७००थ