पिंपरी -पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड विभागाचे 117 कर्मचारी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेवेत कामकाज करत आहेत. हे कर्मचारी गेल्या पंधरा ते वीस वर्षांहून अधिक काळ महापालिकेची सेवा करत आहेत. त्या सर्व कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे, त्यांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधाचा लाभ देण्यात यावा, असे आदेश नगरविकास विभागाने महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिले असल्याची माहिती नगरसेविका माधुरी कुलकर्णी यांनी सोमवारी (दि. 28) पत्रकार परिषदेत दिली.
कुलकर्णी म्हणाल्या की, पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुणे महानगर पहिवहन महामंडळाचे सुमारे 235 कर्मचारी सन 2001 पासून कामकाज करीत होते. त्यातील 118 कर्मचारी सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त झाले होते. 117 कर्मचारी अद्यापही सेवेत कार्यरत आहेत. त्या सर्व कर्मचाऱ्यांचा वेतन, भत्ते व अन्य सोयी सुविधा पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून ते घेत होते. मात्र, ते महापालिकेचे कामकाज करत होते. त्यांची हजेरीची प्रतिपूर्ती दरमहिन्याला महापालिका पीएमपीएमएलकडे पाठवत होती.
पीएमपीएमएलमधील 117 कर्मचाऱ्यांना पालिकेच्या आस्थापनेवर वर्ग करण्यात यावे, अशी कित्येक वर्षापासून त्या कर्मचाऱ्यांची मागणी होती. त्यानुसार गेल्या चार वर्षांपासून सर्व कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत कायमस्वरुपी सामावून घेण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू होता. त्याकरिता महापालिका सर्वसाधारण सभा आणि पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाच्या सभेत 117 कर्मचाऱयांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवर कायमस्वरुपी सामावून घेण्याचा ठराव एकमताने करण्यात आला.
हा ठराव राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडे पाठवून त्या ठरावाला मान्यता देण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. दरम्यान, नगर विकास विभागाने पीएमपीएमएल च्या 117 कर्मचा-यांना महानगरपालिकेच्या सेवेत समायोजित करुन घेण्याचे आदेश उपसचिवांनी दिले आहेत. त्यानुसार पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत कायमस्वरुपी सामावून घेण्याच्या शासन आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच सर्व कर्मचाऱ्यांना सामावून घेतल्याचे पत्र देण्यात यावे, अशी मागणी देखील यावेळी नगरसेविका माधुरी कुलकर्ली यांनी केली.