- अर्ज स्वीकृतीसाठी 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
पिंपरी – महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने महिला व बालकल्याण, मागासवर्गीय, अपंग कल्याणकारी व इतर विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्याच्या अर्ज स्वीकृतीसाठी 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती महापौर उषा ढोरे व सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली. आत्तापर्यंत या योजनांसाठी 11 हजार 638 अर्ज प्राप्त झाले आहेत.
या योजनांच्या अर्ज स्वीकृतीसाठी 25 नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. त्याला 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक जणांना आवश्यक कागदपत्रे जमा करता आलेली नाही. तसेच, काही जणांना ती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यामुळे अर्ज स्वीकृतीस 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज वाटप आणि स्वीकृती शहरातील सर्व नागरी सुविधा केंद्रांमध्ये सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत सुरू आहे. अर्ज मोफत उपलब्ध आहेत.
महापालिकेच्या महिला व बालकल्याण, मागासवर्गीय, अपंग कल्याणकारी व इतर विविध कल्याणकारी योजनांसाठी 1 एप्रिलपासून आत्तापर्यंत एकूण 11 हजार 638 अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी दिली. ते म्हणाले, दहा वर्ष पूर्ण झालेल्या महिला बचतगटांना अर्थसहाय्य, बारावीनंतरचे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी पदवी परीक्षा यासारखे उच्च शिक्षण घेणाऱ्या युवतींना आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य, विदेशातील उच्च शिक्षणासाठी निवड झालेल्या मुलींना तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य, विधवा/घटस्फोटित महिलांना किरकोळ स्वरुपाचा घरगुती व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य, पाचवी ते दहावीमध्ये शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, विशेष व्यक्तींचा सांभाळ करणाऱ्या संस्थेस/पालकास अर्थसहाय्य, पंडित दीनदयाळ उपाध्याय – दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, दिव्यांगांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य, पंडित दीनदयाळ उपाध्याय – पहिली ते पदव्युत्तरपर्यंत शिक्षण घेणाऱ्या अनाथ/निराधार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अशा विविध योजनांच्या अर्ज स्वीकृतीसाठी मुदतवाढ दिलेली आहे.