मुंबई – राज्याचे माजी कृषीमंत्री दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 15 फळ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. या अंतर्गत खड्डे खोदणे, ठिबक सिंचन यासारख्या कामांना 100 टक्के अनुदान देण्यात येते.
त्याचबरोबर आता या योजनेतून आवश्यक त्या खतांसाठी 100 टक्के अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. तसेच, यासाठी अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
मुंडे पुढे म्हणाले, राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. आवश्यकता भासल्यास 100 कोटींच्या तरतुदीमध्ये आणखी वाढ करण्यात येईल. राज्य सरकारने 6 जुलै, 218 रोजी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना राबवण्यास मान्यता दिलेली आहे. या अंतर्गत 15 फळ पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे.
खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे, इत्यादी कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना शासन 100 टक्के अनुदान देते. यापैकी ठिबक सिंचनाचे अनुदान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मिळत असल्याने, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये ठिबक सिंचन ऐवजी आता सर्व प्रकारच्या खतांसाठी 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे, असेही ते म्हणाले.
या योजनेची उद्दिष्टे
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेच्या माध्यमातून पीक आणि पशुधन याबरोबरच फळबागेच्या रुपाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून देणे. योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यास आणि उत्पन्न दुप्पट करण्यास मदत करणे हे उद्दीष्ट आहे.
योजनेत समाविष्ट पिके
आंबा, डाळींब, काजू, पेरू, सीताफळ आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, कागदी लिंबू, नारळ, चिकू, संत्रा, मोसंबी, अंजीर.
नाविन्यपूर्ण बाबी
– फक्त कलमांद्वारे लागवड (अपवाद नारळ रोपे)
– घन लागवडीचा समावेश
– ठिबक सिंचन अनिवार्य
– शेतकऱ्यांचा सहभाग