शिकागो :- अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्या ई-मेल पाठवल्याच्या आरोपाखाली शिकागोमधील एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे पुत्र बॅरोन यांना ठार मारण्याची धमकी या महिलेने ई-मेलद्वारे दिली असल्याचा तिच्यावर आरोप आहे.
ट्रेसी मेरी फिओरेन्झा असे या 41 वर्षीय महिलेचे नाव आहे. धमकीचा संदेश दिल्याबद्दल तिला सोमवारी सकाळी अटक करण्यात आली. या संदर्भात फ्लोरिडाच्या दक्षिणेकडील डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये प्रकरण दाखल करण्यात आले आहे.
ट्रेसी फिओरेन्झा हिने 21 मार्च रोजी फ्लोरिडातील पाम बीच भागातल्या एका शिक्षण संस्थेच्या प्रमुखांना एक ई-मेल पाठवली होती. त्यामध्ये “जेव्हा केव्हा संधी मिळेल, तेंव्हा डोनाल्ड ट्रम्प आणि बॅरोन यांना अगदी समोरून चेहऱ्यावरच गोळी मारेन.’ असे तिने म्हटले होते.
डोनाल्ड ट्रम्प यांचे निवासस्थानदेखील फ्लोरिडातील पाम बीच भागातच आहे. फिओरेन्झा हिने अशीच ई-मेल 5 जून रोजी देखील पाठवली होती. त्यात तिने “आत्मसंरक्षणासाठी ट्रम्प आणि बॅरोन यांच्यावर गोळ्या झाडेन.’ असे म्हटले होते.