168 पैकी केवळ एकच वरिष्ठ महाविद्यालय बाकी
– व्यंकटेश भोळा
पुणे – नगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पुणे विभागात एकूण 168 वरिष्ठ अनुदानित महाविद्यालये आहेत. यातील एक वगळता सर्वच अनुदानित महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करून घेतले आहेत. त्यामुळे राज्यात नॅक मूल्यांकनात पुणे विभागाने आघाडी घेतली आहे.
राज्यातील सर्व अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांनी राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती समितीकडून (नॅक) मूल्यांकन करून घेण्याची सक्ती विद्यापीठ अनुदान आयोगाने केली आहे. मात्र, बहुसंख्य महाविद्यालयांनी अद्यापही त्याची गांभीर्याने दखल घेतलेली नव्हती. मात्र, उच्च शिक्षण विभाग आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान अर्थात रुसामार्फत वेळोवेळी महाविद्यालयांना नॅक मूल्यांकनासाठी पाठपुरावा केल्याने आता त्यास चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे.
सर्वच वरिष्ठ महाविद्यालयांना “नॅक’ मूल्यांकन करून घेणे बंधनकारक आहे. “नॅक’ न झालेल्या महाविद्यालयांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून कोणतेही अनुदान मिळणार नाही. नवीन विषय व वर्ग तुकड्या सुरू करण्यासही मान्यता मिळणार नाही, असे उच्च शिक्षण विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्पष्ट केले होते. बऱ्याचदा लेखी स्मरणपत्रेही महाविद्यालयांना पाठवली आहेत. मात्र, तरीही महाविद्यालयांकडून “नॅक’ मूल्यांकनासाठी पुरेसा प्रतिसाद मिळत नव्हता.
दरम्यान, पुण्यातील ज्या महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकनात चांगले गुण मिळविले आहेत, त्यांना अन्य महाविद्यालयांना मूल्यांकनासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोपवली होती. त्याचा परिणाम नॅक मूल्यांकन केलेल्या महाविद्यालयांची संख्या वाढल्याचे पुणे विभागीय उच्च शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
स्वायत्ततेसाठी महाविद्यालयांचा पुढाकार
पुणे विभागातील 168 वरिष्ठ महाविद्यालये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित आहेत. नॅकच्या प्रतिसादानंतर आतापर्यंत दहा महाविद्यालयांना स्वायत्तता देण्यात आली आहे. गरवारे महाविद्यालयास स्वायत्तता देण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आव्हानांना प्रतिसाद देत पुणे विभागातील अनेक महाविद्यालये स्वायत्ततेसाठी पुढाकार घेत आहेत.
पुणे विभागात एकूण 168 अनुदानित वरिष्ठ महाविद्यालये आहेत. यापैकी एका महाविद्यालयात प्राध्यापकाचे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने नॅक मूल्यांकन केलेले नाही. मात्र, उर्वरित सर्वच महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन केले आहे. करोनाकाळात सर्व महाविद्यालयांना ऑनलाइन बैठक घेऊन त्यांना नॅकसाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे विभागातील 100 टक्के महाविद्यालयांची नॅक मूल्यांकन झाले आहे.
– डॉ. मोहन खताळ, सहसंचालक – पुणे विभागीय उच्च शिक्षण