महाराष्ट्रातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 100 कोटी मंजूर – नितीन गडकरी यांची माहिती

नवी दिल्ली  – कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे, वाहून गेलेल्या अथवा खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम त्वरित सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.

या कामासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी आज ट्‌वीट करुन दिली. यात 52 कोटी रुपये तात्पुरत्या डागडुजीसाठी आणि 48 कोटी रुपये कायमच्या दुरुस्त्या आणि बांधणीसाठी मंजूर करण्यात आले आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण जवळचा वशिष्ठी नदीवरचा पूल देखील पावसामुळे खराव झाला होता, त्याची दुरुस्ती लगेच करुन 72 तासात तो पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असेही गडकरी यांनी सांगितले.

तसेच, परशुराम घाट, कारूळ घाट, आंबा घाट, इथे रस्त्यात आलेले अडथळे देखील दूर करण्यात आले आहेत. तात्पुरत्या दुरुस्तीची कामे आधीच हातात घेण्यात आली असून, कायमची दुरुस्ती करण्याचेही काम प्राधान्याने केले जाईल, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.