#ENGvIND 1st Test Day 2 : कोहलीसह भारतीय फलंदाजीही ढेपाळली

नॉटिंगहॅम – इंग्लंडच्या गोलंदाजीसमोर भारताचा कर्णधार विराट कोहलीसह प्रमुख फलंदाजांनी नांगी टाकली. सलामीवीर लोकेश राहुल व रोहित शर्मा वगळता संघातील एकाही फलंदाजाला चहापानाच्या वेळेपर्यंत दोन अंकी धावा करता आल्या नाहीत. 

कर्णधार कोहलीला तर खातेही उघडता आले नाही. या दोन संघातील या पहिल्या कसोटी सामन्यात गुरुवारी दुसऱ्या दिवशी भारताने दुसरे सत्र संपल्यावर 4 गडी गमावून 125 धावांपर्यंत मजल मारली होती. यावेळी भारतीय संघ 58 धावांनी पिछाडीवर होता.

या सामन्याचा बुधवारचा पहिला दिवस भारतीय संघाने बाजी मारली होती व इंग्लंडचा पहिला डाव 183 धावांवर रोखला होता. त्यानंतर पहिल्या दिवशी बिनबाद 21 धावा करत आश्‍वासक प्रारंभ केला होता. आज खेळ सुरू झाल्यावर रोहित व राहुल यांनी संघाला 97 धावांची सलामी देताना संघाच्या डावाला बळकटी आणली होती. मात्र, रोहित 36 धावांवर बाद झाला आणि त्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी वर्चस्व राखले. त्यांच्या गोलंदाजीसमोर चेतेश्‍वर पुजारा 4, कोहली 0, अजिंक्‍य रहाणे 5 यांनी साफ निराशा केली.

दुसरीकडे सराव सामन्यातील शतकी खेळीच पुढे सुरू केल्याच्या थाटात राहुलने एक बाजू सावरून धरली. त्याने संयमी अर्धशतक साकार केले. चहापानाला खेळ थांबला तेव्हा राहुल 57, तर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत 7 धावांवर खेळत आहेत. राहुलने ही खेळी करताना तब्बल 148 चेंडूंचा सामना करत 9 चौकार फटकावले.

इंग्लंडचा प्रमुख वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने कोहलीचा अडसर दूर केला तसेच पुजारालाही बाद करत भारताच्या मधल्या फळीवर वर्चस्व राखले. ओली रॉबिन्सनने रोहितला बाद केले, तर रहाणे अनावश्‍यक धाव घेताना धावबाद झाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.