खासदार, आमदारांच्या मागणीला आरोग्यमंत्र्यांचा हिरवा कंदील
भोर – उपजिल्हा रुग्णालय भोर येथील 50 खाटांचे रुग्णालयाचे अतिदक्षता विभागासह 100 खाटांच्या रुग्णालयात रूपांतरित करण्याबाबत खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी मागणी केली असता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या मागणीस हिरवा कंदील दाखवून संबंधितांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे बैठक पार पडली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य सारंग शेटे, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. बामणे आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी, मंत्रालयातील संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी ही मागणी सकारात्मक घेतली. भोर येथील उपजिल्हा रुग्णालयास खासदार सुप्रिया सुळे यांनी 11 जानेवारी रोजी भेट देऊन रुग्णालयातील समस्या जाणून घेतल्या होत्या.
त्यावेळी सुळे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बैठकीत रुग्णायात डायलिसीस युनिट सुरु करावे, डिजीटल एक्सरे मशिन उपलब्ध व्हावे, रुग्णालयात रक्त साठवणूक केंद्र सुरु करण्यात यावे, रुग्णालयास अस्थिरोग तज्ञ, कुष्ठरोग, नेत्ररोग, सर्जनची नेमणूक करण्यात यावी, किकवी, वागजवाडी येथे ट्रामा सेंटर सुरू करून अपघात ग्रस्त रुग्णांची गैरसोय थांबवली जावी, वेल्हे येथे खास बाब म्हणून 50 खाटांचे उप जिल्हा रुग्णालय सुरु करण्यात यावे, नसरापूर येथे शासनाचे रुग्णालय सुरु करावे, या व अशा अनेक मागण्यांचा निवेदनात समावेश होता.
यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रसाद व्यास, पंचायत समितीचे सभापती श्रीधर किंद्रे, आरोग्य आयुक्त अनुपकुमार यादव, उपसंचालक संजय देशमुख, डॉ. अशोक नांदापुरकर, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे उपस्थित होते.