पुणेकरांसाठी आणणार आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले 10 व्हेंटिलेटर्स

पुणे – आयआयटी कानपूरच्या विद्यार्थ्यांनी अवघ्या 3 लाख रुपयांत व्हेंटिलेटर तयार केले आहे. तसे 10 यंत्र पुणे महापालिका खरेदी करणार आहे. या व्हेंटिलेटरला केंद्र सरकारनेही मान्यता दिलेली आहे. या विद्यार्थ्यांनी परदेशांतून काही साहित्य आयात करून ही व्हेंटिलेटर्स तयार केली आहेत.

ही 10 यंत्र पुणेकरांना लवकरच मिळणार असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली. याबाबतचा प्रस्ताव आरोग्य विभाग तयार करत असून “सीएसआर’द्वारे निधीतून ही यंत्र घेतली जाणार आहेत. हे व्हेंटिलेटर्स तयार असून, ते आठवडाभरातही मिळतील, असेही अग्रवाल म्हणाल्या.

ऑक्‍सिजन तसेच व्हेंटिलेटर्सची गरज असलेल्या करोना रुग्णांची संख्या वाढत असून, खासगी रुग्णालयांतील व्हेंटिलेटर्सही संपले आहेत. बाजारात 6 ते 10 लाख रुपयांपर्यंत 1 व्हेंटिलेटर उपलब्ध आहे. तेदेखील तातडीने खरेदी केले जाणार आहेत. मात्र, त्याच वेळी आयआयटी कानपूरचे 10 व्हेंटिलेटर्स पुण्यासाठी देण्यास हे विद्यार्थी तयार असून, प्रत्येकी 3 लाख रुपयांना एक व्हेंटिलेटर महापालिकेस मिळणार आहे.

मागील वर्षी करोना काळात महापालिकेने अनेक कंपन्यांना “सीएसआर’अंतर्गत मदत करण्याचे आवाहन केले होते. या निधीत सुमारे 60 लाख रुपये जमा असून आणखी काही व्यावसायिकांनी पालिकेस मदत देण्यास सुरूवात केली आहे. इतर काही कंपन्यांकडूनही दर मागवण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.