‘अनिल देशमुख हा महत्त्वाचा विषय नाही, बॉम्बची गाडी कुणाच्या सांगण्यावरुन ठेवली हे शोधा’

मुंबई – उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे अनिल देशमुख यांनी अखेर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यावर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले. माझ्यासाठी अनिल देशमुख हा महत्वाचा विषय नाही, ती बॉम्बची गाडी कुणी ठेवली हा महत्वाचा विषय आहे, असे राज ठाकरे यांनी म्हंटले आहे.

माझ्यासाठी अनिल देशमुख हा महत्त्वाचा विषय नव्हता. विषय होता मुकेश अंबानींच्या घराखाली पोलिसांनी बॉम्बची गाडी ठेवली. त्याची चौकशी होणार आहे का? राजीनामा दिला चौकशी सुरु झाली, मग तुम्ही विसरुन गेलात. तुमच्या बातम्या बंद झाल्या, मग सगळेच विसरुन जाणार, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. 

विषय हा आहे बॉम्बची गाडी पोलिसांनी ठेवली ती कुणाच्या सांगण्यावरुन ठेवली? पोलीस कुणीतरी सांगितल्याशिवाय असे कृत्य करणार नाहीत. पण चौकशी अनिल देशमुखांची होईलच, पण ही गाडी कुणाच्या सांगण्यावरुन ठेवली याची चौकशी व्हावी, असेही राज ठाकरे यांनी म्हंटले आहे.

आपण तिसरीकडे जातोय. प्रत्येक वेळी हेच होते. विषयाला फाटा नको. मूळ विषय भरकटत जातो आणि कशापासून सुरु होतो हे आपण पाहातच नाही. सुशांतच्या केसमध्ये आत्महत्या केली सुशांत सिंह राजपूतने आणि जेलमध्ये गेला अर्णब गोस्वामी.. कशाचा कशाशी संबंध?’

परमबीर सिंग यांना १०० कोटींचा साक्षात्कार त्यांच्या बदलीनंतर का झाला? बदली झाली नसती तर हा साक्षात्कार झाला नसता का? पण ते बोलले बारमधून पैसे गोळा करा, हे लांच्छनास्पद आहे. बदल्यांचे बाजार होतातच, असेही त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.