Congress MLAs suspended in Gujarat Assembly – गुजरात विधानसभेत एका गैरव्यवहार प्रकरणी आवाज उठवून घोषणाबाजी केल्याच्या कारणावरून सभागृहातून कॉंग्रेसच्या दहा आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. गेल्या वर्षी छोटा उदेपूर जिल्ह्यात एक बनावट सरकारी कार्यालय उघडकीला आले हेाते. या कार्यालयातून सरकारच्या पाटबंधारे विभागाच्या निधीचा अपहार करण्यात आला होता. त्या प्रकरणात कॉंग्रेसचे आमदार आवाज उठवत होते. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान, काँग्रेसचे आमदार तुषार चौधरी यांनी छोटा उदेपूर जिल्ह्यात बनावट सरकारी कार्यालय उघडून विविध सिंचन प्रकल्पांच्या निधीचा गैरवापर करणाऱ्यांवर सरकारने काय कारवाई केली हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. | Congress MLAs suspended in Gujarat Assembly
लिखित उत्तरात आदिवासी विकास मंत्री कुबेर दिंडोर म्हणाले की, छोटा उदेपूर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात असे कोणतेही कार्यालय आढळून आले नाही आणि त्यामुळे कारवाई करण्याबाबत प्रश्नच उद्भवत नाही. या उत्तराने संतप्त झालेल्या चौधरी यांनी दावा केला की गेल्या वर्षी आदिवासीबहुल छोटा उदेपूर जिल्ह्यात अशी पाच बनावट कार्यालये सापडली होती आणि आरोपींनाही पकडण्यात आले होते.
जिल्ह्यात सिंचन प्रकल्पांसाठी कार्यकारी अभियंत्याचे बनावट कार्यालय उभारून सरकारी अनुदानातून ४.१६ कोटी रुपये उकळल्याप्रकरणी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दोन जणांना अटक करण्यात आल्याचा संदर्भ त्यांनी दिला. त्यानंतर मंत्र्यांनी असा घोटाळा झाला होता असे मान्य केले. | Congress MLAs suspended in Gujarat Assembly
मंत्री म्हणाले की, हा घोटाळा राज्य सरकारनेच उघड केला आणि नंतर तो मीडियात आला. आम्ही स्वतःहून कारवाई केली. आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे आणि आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे,असे मंत्री म्हणाले. त्यांचे तोंडी उत्तर लेखी उत्तरापेक्षा वेगळे असल्याने काँग्रेसच्या आमदारांनी भाजप सरकारवर वस्तुस्थिती लपवल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पण त्यांच्यावरील ही कारवाई आजच्या एका दिवसापुरतीच मर्यादित असल्याचे सांगण्यात आले आहे.