नवी दिल्ली : कोरोनचा जगातील 213 देशांमध्ये कहर सुरुच आहे. मागील 24 तासांमध्ये 1 लाख 7 हजार नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत 3157 ने वाढ झाली आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत जवळपास 71.89 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 8 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 35 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरातील जवळपास 60 टक्के कोरोना बाधित रुग्ण फक्त 7 देशांमध्ये आहेत. या देशांमध्ये मिळून कोरोनाग्रस्तांची संख्या 43 लाख आहे.
कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव अमेरिकेमध्ये पाहायला मिळत आहे. अमेरिकेमध्ये 20 लाख लोक आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. तर आतापर्यंत एक लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. परंतु, सध्या अमेरिकेपेक्षा ब्राझीलमध्ये नवे रुग्ण आणि मृतांचा आकडा झपाट्याने वाढताना दिसत आहे.
मागील 24 तासांमध्ये ब्राझीलमध्ये 18,925 नवे रुग्ण समोर आले आणि 813 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 19037 नवे रुग्ण आढळून आले आणि 586 लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. ब्राझीलनंतर रुस आणि भारतात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.