वर्षभरानंतर कारवाई; सहा तालुक्यांतील युवकांना गंडा
सातारा : बेरोजगार तरूणांना नौदल, आर्मी, ओएनजीसी तसेच बँकेत नोकरी लावतो, असे आमिष दाखवून तब्बल १ कोटीची फसवणूक करून वर्षेभरापूर्वी पसार झालेल्या दोघांना बोरगाव पोलीस आणि सहायक पोलीस अधीक्षकांच्या पथकाने अटक केली.
निलेश महादेव कोकणी (दहिवडी, ता. माण), सचिन केपन्ना तरपदार (वय ३४, रा. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, सातारा जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, माण, जावळी, कºहाड, पाटण या तालुक्यातील बेरोज तरूण, तरूणींना नौदल, आर्मी, ओएनजीसी तसेच बँकेत नोकरी लावतो, असे आमिष संशयित आरोपींसह आणखी काहींनी दाखवले होते.
तरूणांना कलकत्ता येथे नेऊन त्यांना बनावट नियुक्तीपत्र दिले. त्यानंतर त्यांच्याकडून प्रत्येकी तीन ते पाच लाख रक्कम स्वीकारली. असे सुमारे १ कोटीची रक्कम बेरोजगार युवकांकडून त्यांनी उकळली. फसवणूक झालेल्या युवकांनी गत वर्षी बोरगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, गुन्हा दाखल होताच संबंधित संशयित पसार झाले होते. या प्रकरणात काही आरोपींना अटक करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपत्रही दाखल केले होते. परंतु हे दोघे पसार होते.
दरम्यान, निलेश कोकणी हा दोन दिवसांपूर्वी दहिवडी येथे आला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी आपल्या टीमसह दहिवडी गाठले. या ठिकाणी सापळा रचून कोकणीला अटक केली. तर या गुन्ह्यातील दुसरा संशयित सचिन तरपदार हा पनवेल येथे असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने तेथे जाऊन तरपदारला अटक केली. या टोळीकडून आणखी कोणाची फसवणूक झाली असेल तर बोरगाव पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.