सातारा – नववर्षातील पहिला मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पारपंरिक पद्धतीने साजरा झाला. अनेक महिलांनी संक्रांती दिवशी हळदी कुंकवाचा समारंभ घरी ठेवून एकमेकीला वाणवसाचे पदार्थ लूटले तसेच तिळगुळ घ्या गोड बोला म्हणत हा सण साजरा केला.
या सणाचे दिवशी विड्यांच्या पानाची देवघेव करण्याची प्रथा पारंपारिक पद्धतीने महाराष्ट्रात जोपासली जाते. सातारा शहरातील यादोगोपाळ पेठेतील घाटगे विठ्ठल मंदिर, मंगळवार पेठ येथील श्री गवई विठ्ठल मंदिर शनिवार,पेठेतील शहाराम मंदिर तसेच विविध विठ्ठल रुक्मिणी मंदिरात या सणासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत संक्रांति दिवशी पर्वकाळ असल्यामुळे महिलांचा उत्साह अधिकच होता. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत घरोघरी हळदी- कुंकू समारंभाचे आयोजन केले जाते.
दरवर्षी पौष महिन्यातील मकर संक्रांतीला महिला वर्ग मोठ्या उत्साहाने साजरा करतो, मात्र यावर्षी सोम वारी पौष अष्टमीच्या मुहूर्तावर संक्रांतीचा हा सण वाणवसा घेणे आणि मंदिरात जाऊन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन देवीपुढे लुटावयाचे जिन्नस ठेवून तसेच ओटी भरून पारंपारिक पद्धतीने साजरा झाला. मंदिरामध्ये आलेल्या सुवासिनींनी एकमेकीला हळदीकुंकू लावून तिळगुळ आणि काटेरी हलवा देत तसेच घरोघरी लुटावयाला आणलेले जिन्नस एकमेकीला देत हे सौभाग्याचे वाण दिले.
नवविवाहित महिला तसेच छोट्या बालकांना काळ्या रंगाचे कपडे तसेच काटेरी हलव्याचे दागिने परिधान करून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. सातारा जिल्ह्यातील फलटण येथील श्रीराम मंदिर ,फलटण,तालुक्यातील सीताबाईचा डोंगर, चाफळ येथील श्रीराम देवस्थान येथे महिलांनी वाणवसा करण्यासाठी तसेच पूजेसाठीमोठी गर्दी केली होती.