थेऊर- ग्रामविकास विभाग, राज्य शासन अधिसूचना, उच्च न्यायालय मुंबई यांच्या अंतरिम निर्णयानुसार पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील 20 ऑगस्ट अखेर मुदत संपलेल्या 47 ग्रामपंचायतीवर जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रशासकाची नियुक्ती केली आहे.
महामारीमुळे राज्य निवडणुक आयोगाच्या वेळापत्रकानुसार ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेणे शक्य झाले नसेल तर राज्य शासनास राज्यपत्रातील अधिसूचनेव्दारे अशा पंचायतीचा प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी तरतूद केली आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याचे अधिकार शासनस्तरावर प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान केले आहेत. अधिकाराचा वापर करून यांनी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने प्रशासकांची नियुक्ती केली आहे. त्यांना शुक्रवार (दि.21) पासून नेमून दिलेल्या ग्रामपंचायतीकडील प्रशासकपदाचा कार्यभार तात्काळ स्वीकारण्याचा आदेश दिला आहे.
हवेली तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीवर नेमण्यात आलेले प्रशासक पुढीलप्रमाणे- अष्टापूर, केसनंद व शिरसवडी -(एस. आर. मोरे), आर्वी व गाउडदरा – (एन. एम. म्हेत्रे), उरुळी कांचन, आळंदी म्हातोबाची, सोरतापवाडी, तरडे, वळती व शिदवणे -(एन. के. धापटे), औताडे हांडेवाडी, वडकी व शेवाळवाडी – (डी. एच. म्हेत्रे), बकोरी, वढु खुर्द, तुळापुर व भावडी – (एम. पी. वाघमारे), भिवरी प्रयागधाम – (ए. एस. बागुल), आंबी, डोणजे, सोनापूर, गोऱ्हे बुद्रुक, गोऱ्हे खुर्द, वरदाडे व घेरासिंहगड – (एन. डी. कारंडे), डोंगरगांव व सांगवी सांडस – (एस. आर. मोरे), कोरेगांवमूळ, वडाचीवाडी व खेड शिवापूर – (डी. एच. म्हेत्रे), लोणी काळभोर, थेऊर, कुंजीरवाडी, मांजरी खुर्द व भवरापूर- (ए. डी. घोगरे), कुडजे, खडकवाडी मांडवी बुद्रुक, मांडवी खुर्द, सांगरूण, व जांभळी – (डी. ए. खोसे), रहाटवडे, श्रीरामनगर, शिवापूर व कोंढणपूर – (एन. एम. म्हेत्रे).
प्रशासकपदी नेमणूक झालेल्या व्यक्तीस महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता – 2011 मधील तरतुदीनुसार सरपंचपदाची अधिकार व कर्तव्य प्राप्त होतील. या नियुक्त्या ज्यादिवशी विधीग्राह्य गठित झालेली ग्रामपंचायत अस्तित्वात येईल, त्या दिवसापासून प्रशासकपद व प्रशासकाचे अधिकार संपुष्टात येतील. वरीलप्रमाणे ज्या व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात येईल, अशा व्यक्तीकड़ून आपली कर्तव्य पार पाडताना झालेल्या गैरवर्तवणुकीबद्दल किंवा कोणत्याही लांच्छनास्पद वर्तवणूक अथवा कर्तव्यात दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आल्यास या व्यक्तीस पदावरून दूर करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत.