नवी दिल्ली – भारतातील कोविडग्रस्तांच्या संख्येने आता अधिकृतपणे 29 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. केवळ दोन दिवसांच्या अवधीत ही संख्या 28 लाखांवरून 29 लाखांवर गेली आहे. काल एका दिवसांत देशभरात कोविडच्या 68 हजार 898 केसेस आढळून आल्या आहेत.
आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांमध्ये देशातील एकूण कोविडग्रस्तांची संख्या आता 29 लाख 5 हजार 823 इतकी झाली असून मृतांची संख्या 54 हजार 849 इतकी झाली आहे. तथापि कोविडग्रस्त रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 74 पूर्णांक 30 टक्के इतके झाले असून मृतांचा दर हा 1.89 टक्के इतका आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 6 लाख 92 हजार 28 इतकी असून उर्वरित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.