सासवड – पुरंदर तालुक्यात करोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. त्यामुळे रुग्णवाहिकांची संख्या कमी पडत असल्यास टेंडर पद्धतीने रुग्णवाहिका घ्याव्या. त्याचबरोबर सर्व रुग्णवाहिकांमध्ये ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध असणे सक्तीचे आहे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रशासनाला दिल्या.
सासवड येथील पंचायत समिती सभागृहात पुरंदर तालुक्यातील करोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रसाद बोलत होते. याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, सासवड ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, तहसीलदार रूपाली सरनोबत, मिलिंद टोणपे, पूनम कदम, विनोद जळक, मोहन गायकवाड, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, सुदाम इंगळे, विराज काकडे, पंचायत समिती सभापती नलिनी लोळे, गौरी कुंजीर, विजय कोलते, अशोक टेकवडे, हेमंत माहुरकर, दत्ता चव्हाण, पुष्कराज जाधव, विठ्ठल झेंडे, हरिभाऊ लोळे आदी उपस्थित होते.
तहसीलदार सरनोबत म्हणाल्या की, तालुक्यामध्ये आतापर्यंत 944 बाधित असून त्यापैकी 37 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 700 जणांनी करोनावर मात केली आहे. 207 जणांवर सध्या उपचार सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
आयुष प्रसाद म्हणाले की, तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक, ज्यांना शुगर व बी.पीचा आजार आहे त्यांना कोणत्याही प्रकारचे आजार होता कामा नये. याची सर्व पातळीवर दखल घेऊन संबंधितांवर तातडीने उपचार करण्यात यावेत. तसेच सर्वांना मास्क अनिवार्य करा, घर टू घर सर्व्हेवर भर द्यावा, असे त्यांनी नमूद केले.
- “त्यासाठी’ हॉस्पिटलचे प्रस्ताव पाठवा
महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पुरंदर तालुक्यामध्ये केवळ एकच हॉस्पिटल उपलब्ध आहे. या योजनेसाठी तालुक्यातील इतर हॉस्पिटलचे प्रस्ताव आठ दिवसांमध्ये दाखल करण्यात यावेत असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.