पवार-उद्धव ठाकरेंचा आमदारांना विश्वास
मुंबई : काळजी करू नका, राज्यात सरकार आपलेच स्थापन होईल. पण सावध राहा, आपण सत्ता आणणारच, असा विश्वास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या आमदारांना दिला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत रेनेसॉं हॉटेल येथे राष्ट्रवादी आमदारांच्या बैठक झाली. या बैठकीला उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन राष्ट्रवादीच्या आमदारांशी संवाद साधला. त्याचप्रमाणे अंधेरी येथील ललित हॉटेलमध्ये शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीअगोदर शरद पवार व उद्धव ठाकरे या दोन नेत्यांमध्ये सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली. त्यानंतर आमदारांशी या दोन्ही नेत्यांनी संवाद साधला. समोरून दगाफटका करण्याचा प्रयत्न होईल. तेव्हा सावध रहा. कोणत्याही परिस्थितीत आपण सत्ता स्थापन करणारच, असा विश्वास देतानाच विरोधकांच्या आरोपांकडे लक्ष न देण्याचेही आवाहन उद्धव ठाकरे यांनी आमदारांना केले.
आमदारांसोबत झालेल्या बैठकित शरद पवार यांनी आमदारांना तुमच्यावर कुणाचा दबाव आहे का? असा सवाल केला. यावर आमदारांनी अजित पवार यांचा फोन आल्याचे सांगितले. पण काहीही झाले तरी आम्ही तुमच्या सोबतच आहोत. शरद पवार हेच आमचे नेते आहेत, अशी ग्वाही आमदारांनी दिली.
मी पक्षासोबतच – धनंजय मुंडे
धनंजय मुंडे यांच्याशी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी वेगळी चर्चा केली. धनंजय मुंडे यांच्या भूमिकेबाबत दोन्ही पक्षांचे नेते साशंक असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सध्या चालू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये पहिल्यांदाच मौन सोडत मुंडे यांनी ट्विटरवरून आपली भूमिका मांडली. “मी राष्ट्रवादीसोबत आणि शरद पवार साहेबांसोबतच आहे, कुणी कोणताही संभ्रम निर्माण करू नये’, असे ट्विट त्यांनी केले आहे.