पिंपरी – गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा गुरुवारी पुनश्च हरिओम झाला. गुरुवारी पीएमपीच्या 99 बस शहरात धावल्या. पुणे व पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यावर पीएमपीने गुरुवारी एकूण 25 टक्के बस उतरिवल्या. पहिल्याच दिवशी या दोन्ही शहरांमध्ये मिळून 477 बसमधून 34 हजार 443 प्रवाशांनी प्रवास केला.
कोविड -19 विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार 23 मार्चपासून पुणे व पिंपरी-चिंचवड उपनगरातील प्रवासी वाहतूक सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, लॉकडाऊन टप्प्या-टप्प्याने शिथिल केला जात असल्याने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात दैनदिन व्यवहार, खासगी दुकाने, कंपन्या, लघु उद्योग व सरकारी कार्यालये सुरु झाली असल्याने प्रवासी व लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शासनाच्या नियमावली, अटी व शर्तीचे पालन करत गुरुवारी पीएमपीच्या वतीने 477 बसचे संचलन करण्यात आले त्यापैकी 99 बस ह्या पिंपरी चिंचवड शहरात धावल्या. शहरातील निगडी पीएमपी आगाराच्या 38, भोसरी आगार 33 तर, पिंपरी आगाराच्या 28 बसचा समावेश होता.
बसमध्ये कमाल 22 आसनावर प्रवाशांनी प्रवास केला तर, मास्क न घातलेल्या तसेच 10 वर्षाखाली मुले व 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश नाकारण्यात आला. प्रवाशांना बसमध्ये झिकझॅक पद्धतीने बसवण्यात आले होते. दिवसाअखेर दोन्ही शहरांमध्ये मिळून 477 पीमपी बसेसच्या 2 हजार 548 फेऱ्या झाल्या होत्या. या माध्यमातून 5 लाख 56 हजार 924 रुपये इतका महसूल प्राप्त झाला होता. लॉकडाऊन सुरु होण्यापुर्वी शंभर टक्के बसेसचे संचलन सुरु असतांना सुमारे 80 लाख दैनदिन महसूल प्राप्त होत होता.