- आयुक्तांचे आवाहन : दहावीच्या परीक्षा सुरळीत चालू राहणार
पिंपरी – करोना व्हारसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील शाळांना सुट्या दिल्या आहेत. सुटीच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी बागांमध्ये, गर्दींच्या ठिकाणी न जाता घरी रहावे, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. दरम्यान सर्व शाळांना सुटी असली तरी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा मात्र, सुरळीत चालू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचे रुग्ण व संशयितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्याचा अधिक प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्य सरकारने शहरातील शाळांना आजपासून सुट्या जाहीर केल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत सुट्या असणार आहेत. विद्यार्थ्यांनी घरी रहावे यासाठी शाळांना सुट्या दिल्या आहेत. शहरात इतरत्र फिरणे टाळा, बागांमध्ये किंवा गर्दींच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जाऊ नये. याबाबत पालकांनी विद्यार्थ्यांना कल्पना द्यावी. मुख्याध्यापकांमार्फत शाळेतील सर्व पालकांना याची स्पष्ट जाणीव करून द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
शाळा आणि महाविद्यालयांना करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सुट्या जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे मुलांनी सार्वजनिक ठिकाणी बागा, उद्याने अशा ठिकाणी नेल्यास गर्दी होऊन पुनःश्च प्रसाराचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे पालकांनी गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक स्थळी गर्दी होऊन करोनाचा प्रसार होऊ शकतो, अशा जागी मुलांना घेऊन जाऊ नये अथवा पाठवू नये. आपापल्या पाल्ल्यांना हात धुण्याचे महत्त्व समजावून सांगावे. चेहेऱ्याला डोळ्यांना, नाकाला अथवा तोंडाला वारंवार स्पर्श न करण्यास सांगावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. खोकताना अथवा शिंकताना नाकासमोर रुमाल धरावा. कोणालाही सर्दी, खोकला अथवा ताप अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी केले आहे.