नगर – जिल्ह्यात करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, यापुढील काळात करोना चाचणीचे अहवाल जलद गतीने येणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी आता डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये रॅपिड टेस्टिंग पीसीआर मशिन आजपासून उपलब्ध झाली असून, येथून करोनाबाबतचे अहवाल अतितत्काळ करण्यात येतील, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
अवघ्या आठ तासांत अहवाल देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. पूर्वी केवळ सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे असलेल्या रुग्णांनाही डॉक्टरांनी दिलेल्या चिठ्ठीनंतरच चाचणी करता येत होती. त्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात स्त्राव जमा करण्यात येत होते.
मात्र, तेथेही यंत्रणेवरील वाढता ताण होता. त्यामुळे तेथून अहवाल मिळण्यासाठी किमान एक ते दोन दिवसांचा कालावधी लागत होता. त्याच दरम्यान संसर्गाचा धोका देखील वाढायचा. चाचणी निकाल येईपर्यंत रुग्णांवर कुठल्याही प्रकारचे उपचार करता येत नव्हते. त्यात रुग्णांचे नातेवाईक मानसिक तणावात असायचे. दुसरीकडे खासगी लॅबमध्ये करोना चाचणी केल्यानंतरही त्या अहवालाविषयी शंका होत्या.
मात्र, सरकारने नागरिकांना करोना चाचणी करण्याची मुभा दिली आहे. वाढती रुग्ण संख्या, अहवालासाठी लागणारा वेळ, त्यातून वाढणारा धोका, या सगळ्यातून प्रशासनाचा ताणही कमी होईल, असे ते म्हणाले.
संसर्गाचा धोका कमी होईल..!
करोना चाचणीचे अहवाल लवकर प्राप्त झाल्यानंतर तातडीने उपचारही होतील. त्यातून संसर्गाचा धोका कमी होईल, अशी भूमिका खासदार डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केली. तसेच डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सरकारने ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच चाचणी होईल. त्या चाचणीला इंडियन मेडिकल कौन्सिल अँड रिसर्च नवी दिल्ली यांनी मान्यता असल्याने यानंतर पुढे कोणतीही नवी चाचणी करण्याची आवश्यकता नसेल, असेही खासदार डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.