पहा डोनाल्ड ट्रम्प यांचा पहिल्यांदाच मास्क घातलेला लूक

न्यूयॉर्क : अमेरिकेत करोनाचा प्रादुर्भाव जगात सर्वात जास्त आहे. त्यातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या कृतीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अमेरिकेत करोनाचा शिरकाव झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिगसह मास्क लावण्यासाठी सगळीकडे सांगितलं जात असताना ट्रम्प मात्र, प्रचार सभांसह सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावताच वावरत होते. त्यावरून त्यांना अनेकदा प्रश्नही विचारण्यात आले होते. मात्र, अखेर करोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीपोटी ट्रम्प यांनाही मास्क लावावा लागला आहे.

चीनला करोनासाठी नेहमी जबाबदार धरणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सार्वजनिक ठिकाणांसह प्रचार सभांनाही मास्क न लावताच जात असल्याचे आतापर्यंत दिसून येत होते. त्यावरून त्यांना अनेकदा पत्रकार परिषदांमध्येही विचारण्यात आले. मात्र, ट्रम्प विनामास्क वावरताना दिसत होते. पहिल्यांदाच ट्रम्प यांचा मास्क घातलेला लूक समोर आला आहे. ट्रम्प यांनी वॉल्टर रीड राष्ट्रीय लष्करी वैद्यकीय केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी जखमी जवानांची व आरोग्य कर्मचाऱ्यांची भेट घेतली. या भेटीवेळी ट्रम्प यांनी तोंडावर मास्क लावलेला होता.

यापूर्वी ट्रम्प यांनी सार्वजनिक जीवनात वारताना मास्क घालण्यास सातत्याने नकार दिला होता. त्याचबरोबर अमेरिकन लोकांनाही त्यांनी तसे आवाहन केले होते. हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे होते. मात्र, या भेटीपूर्वी ट्रम्प यांनी वेगळी प्रतिक्रिया नोंदवली. “मला असे वाटते की ज्यावेळी आपण रुग्णालयात असता, विशेषतः एका विशिष्ट परिस्थितीत जेव्हा तुम्ही अनेक सैनिकांशी बोलता. काही लोक बरे झालेले आहेत, अशा वेळी मला वाटत की मास्क घालणं ही चांगली गोष्ट आहे,” असे ट्रम्प हे व्हाईट हाऊस येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.