- गेम खेळताना झटका आल्याने 25 वर्षीय तरुण झाला बेशुद्ध
- उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात झाला मृत्यू
देहुरोड – मोबाईलवर पबजी गेम खेळता खेळता झटके येऊन दोन दिवसांपूर्वी बेशुद्ध झालेला 25 वर्षीय तरूणाचा शनिवारी (दि. 18) सकाळी सातच्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाला. रावेत येथे ही घटना घडली.
हर्षल देविदास मेमाने (वय 25, रा. शिंदे वस्ती, रावेत) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल हा गुरुवारी (दि. 16) सायंकाळी चारच्या सुमारास पबजी गेम खेळत होता. गेम खेळता-खेळता त्याला झटके येऊन तो बेशुद्ध झाला. त्याला उपचारासाठी त्याच्या नातेवाईकांनी रावेत येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान शनिवारी (दि. 18) सकाळी सातच्या सुमारास मृत्यू झाला.
या प्रकरणी डॉ. महेश कुदळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मोबाईलवर एखाद्या गेमचा अधीन होऊन मोबाईलवर सतत खेळत राहण्याने मेंदूवर होणारा ताणामुळे, मेंदूवर रक्तस्त्राव होऊन आणि तहान भूक विसरून शरीरात निर्माण होणार अशक्तपणा यामुळे झटके येऊन बेशुद्ध होणे/लकवा/ मेंदूवरील आजार निर्माण होणे अशी घटना मोबाईलच्या अति वापर करण्याने होत असल्याचे स्पष्ट होत आहे.