बारामती-खाद्यपदार्थ आणण्यासाठी घरुन बारामती शहरात आलेल्या मतीमंद तरुणीचा खून झाल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी संशयित आरोपी दत्ता पोपट खरात (रा.साठेनगर, बारामती) यास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मुलीची आई मंगल दिलीप पाथरकर हिने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रुपा उर्फ नीता दिलीप पाथरकर (वय 30, रा. अनंतनगर, आमराई) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.
रुपा ही 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता गावात खाण्यासाठी पदार्थ घेऊन येते म्हणून गावात आली; मात्र दोन दिवस ती बेपत्ता होती. सात तारखेला माळेगाव रोड येथील शिंदे पार्क या बांधकाम चाललेल्या इमारतीमध्ये रुपा मृत अवस्थेत आढळली.बिल्डींगच्या सुरक्षारक्षकाने तिचा मृतदेह प्रथम पाहिला. रुपा हिच्या डोक्यावर जोरदार आघात केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासणीमध्ये निष्पन्न झाले आहे. नीता हिच्यावर खून करण्यापूर्वी अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता पोलीस सुत्रांनी व्यक्त केली आहे.