युरोपियन समुदायातून बाहेर पडण्याच्या बाजूनेही कौल मिळाल्याचा दावा
लंडन : ब्रिटीश पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ब्रिटन मधील सार्वत्रिक निवडणुक बहुमताने जिंकली आहे. त्यामुळे त्यांची या पदावर फेरनिवड झाली आहे. ब्रिटन मधील संसदेत बहुमतासाठी किमान 326 जागा मिळणे अपेक्षित असते.
जॉन्सन यांच्या कॉन्झरव्हेटीव्ह पक्षाने तो आकडा पार केला आहे. ब्रिटन मध्ये युरोपियन समुदायातून बाहेर पडायचे किंवा नाही यावर द्विधा अवस्था होती. पण बोरीस जॉन्सन यांनी युरोपियन समुदायातून ब्रिटनने बाहेर पडावे अशीच भूमिका घेत प्रचार केल्याने त्यांना मिळालेले बहुमत हे बेक्रिझ्ट च्या बाजूनेच मिळालेले बहुमत आहे असे मानले जात आहे.
या बहुमतामुळे लोकांना ब्रिटनने स्वतंत्रपणे देश मजबूत करण्याची प्रक्रिया पुढे नेण्याचा अधिकार मिळाला आहे असे प्रतिपादन विजयी पक्षाच्यावतीने करण्यात आले आहे. ब्रिटनची संसद 650 सदस्यांची आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला 226 चा आकडा पार करीत कॉन्झरव्हेटीव्ह पक्षाने 363 जागा जिंकल्या आहेत.
अजूनही काही जागांचे निकाल येणे बाकी आहे. पण त्याच्या आधीच सरकारचे बहुमत सिद्ध झाले आहे. विरोधी लेबर पार्टीला या निवडणुकांमध्ये मोठा पराभव पत्करावा लागला असून या पराभवाचे खापर त्यांचे नेते कोर्बिन यांच्यावर फोडले जात आहे. ब्रेक्झिट विषयी ठोस भूमिका न घेतल्यानेच त्यांच्या पक्षाला पराभवाचा सामना करावा लागल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान जॉन्सन यांचाच पक्ष या निवडणुकीत स्पष्ट बहुमताने विजयी होईल असे भाकित गुरूवारी घेण्यात आलेल्या एक्झिट पोल मधून दिसून आले होते.