जाधववाडी – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने करोनाच्या सावटाखाली जाधववाडी, कुदळवाडी, चिखली, मोशी पंचक्रोशीत अत्यंत साधेपणाने बैलपोळा व सर्वपित्री अमावास्या साजरी करण्यात आली.
फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत उपनगरांमध्ये बैलपोळा साजरा करण्यात आला. पारंपरिक पद्धतीने बैलांना सजवून बैलांच्या अंगावर गुलाल व भंडारा उधळून बैलपोळ्यानिमित्त बैलांचे औक्षण करण्यात आले. यानिमित्ताने ग्रामस्थांमध्ये उत्साह पाहायला मिळाला.
वर्षभर धन्याची चाकरी करून थकलेल्या बैलाला आज पूर्णतः आराम दिला जातो. त्याला पोळीचा नैवद्य करून खाऊ घातला जातो. बैलांना सजवून त्यांच्या खांद्याला तूप व हळद लावून खांदे मळले जातात. सध्या महागाईच्या काळात काही ठिकाणी तेलही वापरले जाते. आजच्या दिवशी बळीराजा बैलांचा आपल्या संसारासाठी, शेतीसाठी जे आहोरात्र कष्ट करतो त्यातून उतराई होण्यासाठी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करत असतो.
दरवर्षी बैल पोळ्याच्या दिवशी चिखली, जाधववाडी, मोशी, कुदळवाडी परिसरात वाजत गाजत बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढली जाते. परंतु यावर्षी बैलपोहा सणावर करोनाचे सावट असल्याने बळीराजाने या सर्व गोष्टींना फाटा देत साध्या पद्धतीने उत्सव साजरा केला.