विशेष प्रतिनिधी प्रत्यक्ष ताबारेषेवरून (लडाख) – प्रत्यक्ष ताबारेषेवरील फिंगर चार जवळ चिनी सैन्य उंच भागात तळ ठोकून असणाऱ्या भारतीय जवानांचे लक्ष विचलित करण्यासाठी ध्वनिप्रक्षेपकांवरून पंजाबी गाणी लावत आहेत. या पद्धतीने ते सायकॉलॉजिकल युद्ध खेळत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
1962 च्या युद्धाआधी चिनी सैन्याने असेच दबावतंत्र खेळले होते. त्यावेळ त्यांनी बॉलीवूडमधील गाणी लावली होती. त्यातून त्यांना कदाचित आम्हाला भारतीय भाषा समजते, एवढेच नव्हे तर आम्हाला तुमच्या सर्व हालचाली समजतात, असे दाखवण्याचा प्रयत्न असावा.
भारतीय लष्करातील बहुतांश जवान आणि अधिकारी हे हिंदी आणि पंजाबीत संवाद साधतात. कदाचित भूतकाळात त्यांनी भारतीय जवान हिंदी आणि पंजाबी गाण्यावर नाचत असताना पाहिले असावे त्यामुळे अलीकडच्या घटनांनी आम्ही विचलित झालेलो नाही, असेही भासवायचे असेल, असे मत काही जवानांनी व्यक्त केले.
सीमवरील तणाव ही किरकोळ बाब आहे. किंवा पूर्व लडाखमध्ये पर्वतीय भागातील सध्याच्या घडामोडी फारशा गांभीर्याने घेत नाही, असेही त्यांना दाखवायचे असेल, असेही जवानांनी सांगितले.
भारत आणि चीन लष्कर फिंगर चार जवळ गोळीबाराच्या टापूत आले आहे. येथे आठ सप्टेंबर हवेत गोळीबार करण्यात आला होता. पेन्गोंग तलावाच्या शेजारील फिंगर, गोग्रा आणि कोनग्रुंग भागात घुसखोरी करण्याच प्रयत्न केला होता. त्यामुळे या भागात एप्रिल – मेपासून तणाव आहे. भारतीय लष्कराने या भागात आपली सज्जता वाढवली आहे.