- आरटीओ कार्यालय; 31 मार्चपासून बीएस 4 ची नोंदणी होणार बंद
पिंपरी – येत्या 1 एप्रिलपासून केवळ बीएस 6 वाहनांची नोंदणी केली जाणार असून बीएस 4 वाहनांची नोंदणी 31 मार्चपासून बंद होणार आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयात बीएस 4 वाहनांच्या नोंदणीची धावपळ सुरू आहे. अवघे बारा दिवस शिल्लक असल्याने आपल्याकडे शिल्लक असलेली वाहने नोंदविण्यावर सध्या विक्रेत्यांचा भर पहावयास मिळत आहे. तर बाजारात बीएस 6 वाहनेही उपलब्ध झाल्याने 1 एप्रिलपूर्वीच या वाहनांच्या नोंदणी सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
गुडी पाडव्याच्या मुहूर्त साधत बीएस 4 श्रेणीच्या वाहनांचा साठा संपवण्यासाठी वितरक व उत्पादकांनी मोठी तयारी केली आहे. यासाठी काही सवलती जाहीर केल्या असून ग्राहकांना आकर्षीत केले जात आहे. 2017 साली बीएस 4 वाहनांची सक्ती केल्यावर जुन्या बीएस 2 वाहनांचा साठा संपवण्यासाठी वितरक व उत्पादकांची मोठी दमछाक झाली होती. मात्र, यावेळी सात-आठ महिन्यांपुर्वीच वितरकांना बीएस 6 वाहनांबद्दल माहिती देण्यात आल्याने वितरकांनी विक्री अपेक्षित साठा करून ठेवला आहे.
शेतीच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांचा साठा अल्प आहे. तर, प्रवासी वाहनांच्या विक्रीसाठी 50 हजारांपासून ते दिड लाखांपर्यंत सवलती दिल्या जात आहेत. बीएस 4 श्रेणीच्या वाहन विक्री व नोंदणीसाठी अवघे 13 दिवस बाकी राहिल्याने नवीन बीएस 4 वाहनांच्या नोंदणीवर भर दिला जात आहे. गेल्या दोन दिवसांत 628 बीएस 4 वाहनांची नोंदणी पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयात झाली आहे.
थेट बीएस 6 बाजारात
बीएस-2 (2001), बीएस-4 (2017) तर, आता बीएस-6 श्रेणीतील इंजिन (2020) असलेली वाहने बाजारात दाखल झाली आहेत. बीएस- 5 ऐवजी थेट बीएस-6 श्रेणीची वाहने बाजारात दाखल केली जाणार आहेत. बीएस 5 श्रेणी लागू करण्यास भारतामध्ये विलंब झाल्याने आता थेट बीएस 6 श्रेणी दाखल केली जाणार आहे. या श्रेणीतील इंजिनचे दर अधिक असल्याने वाहनांच्या किंमतीही वाढणार आहेत.
बीएस -4 वाहने 31 मार्चपासून बंद होणार आहेत. वितरक, उत्पादक व ग्राहकांना शासनाकडून अगोदरच माहिती उपलब्ध करून दिल्यामुळे कोणतीही गडबड होणार नाही. विक्रेत्यांनीही विक्रीएवढाच साठा शिल्लक ठेवल्याने बीएस 4 श्रेणीची वाहने 31 मार्चपर्यंत विक्री होतील. तसेच त्यांची नोंदही केली जाणार आहे.
– विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.