तेहरान : इराणमध्ये कोविड-19 या रोगाचा कहर झाला असून देशातील मृतांची संख्या 988 इतकी झाली आहे. इराणमध्ये 16 हजारांपेक्षा अधिक जणांना करोना विषाणूची बाधा झाली आहे. त्यामुळे या रोगाचा अधिक फैलाव होऊ नये म्हणून तब्बल 85 हजार कैद्यांना तुरुंगांमधून तात्पुरते सोडून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामध्ये राजकीय कैद्यांचीही सुटका करण्यात येणार आहे. न्यायविभागाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. “इराणमधील विषाणूचा फैलाव चीनपाठोपाठ अधिक गंभीर आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे 85,000 कैद्यांची सुटका करण्यात आली आहे.
तुरुंगातही या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी ही खबरदारीची उपाययोजना केली आहे, ‘असे न्यायपालिकेचे प्रवक्ते गुलामहोसेन इस्माइली यांनी सांगितले. मुक्त करण्यात आलेल्या 50 टक्के कैदी सुरक्षेशी संबंधित गुन्ह्यांमधील कैदी आहेत, असेही त्यांनी सांगितले.
मात्र या कैद्यांना पुन्हा तुरुंगात कधी आणले जाईल, याबाबत त्यांनी तपशीलाने काहीही सांगितले नाही. इराणने 70 हजार कैद्यांची सुटका केली जाईल, असे 9 मार्च रोजी जाहीर केले होते. मात्र यामध्ये राजकीय कैद्यांचा समावेश नव्हता.
करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी इराणने त्वरित सर्व राजकीय कैद्यांना गर्दी व रोगराई असलेल्या तुरुंगातून मुक्त करावे, असे संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकारांवरील इराणमधील विशेष समन्वयक जावेद रेहमान यांनी तेंव्हाही सांगितले होते. केवळ पाच वर्षापेक्षा कमी शिक्षा भोगलेल्यांनाच मुक्त केले गेले, असे रेहमान म्हणाले.