पुणे : मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पुणे शहरातील 500 चौरस फूटांपर्यंतच्या निवासी मिळकतींना कर माफी करण्यात यावा असा ठराव स्थायी समितीत देण्यात आला आहे. माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम आणि नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांनी हा ठराव दिला असून येत्या मंगळवारी होणाऱ्या समितीच्या बैठकीत तो मान्यतेसाठी येणार आहे.
मुंबई महापालिकेने नुकतेच मुंबई महापालिकेच्या हद्दीतील 500 चौरस फूटा पर्यंतच्या घरांना करमाफ केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महापालिकांकडून अशा प्रकारचे ठराव करण्यात येत आहेत. पुण्यातही अशा लहान मिळकती असून हा निर्णय झाल्यास या मिळकतधारकांना मोठा दिलासा मिळ्णार आहे. त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही 500 चौरस फूटांपर्यंतच्या निवासी मिळकतींना कर माफी करण्यात यावी असा ठराव कदम आणि दुधाने यांनी दिला आहे.
अर्बन सेलचीही आयुक्तांकडे मागणी
दरम्यान, महापालिकेकडून मिळकतधारक स्वत: राहत असल्यास दिली जाणारी 40 टक्के करसवलतही रद्द केली आहे. त्यातच, कर न भरल्यास सर्व सामान्यांना चक्रवाढ व्याजापेक्षा अधिक दराने महापालिका दंड आकारते त्यामुळे नागरिकांची आर्थिक कोंडी होत असून महापालिकेने मुंबईच्या धर्तीवर कर सवलत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अर्बन सेलचे पुणे शहर प्रमुख नितीन कदम यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.