चंदीगड – पंजाब मधील ज्येष्ठ आयपीएस अधिकारी विरेशकुमार भवरा हे राज्याचे नवीन पोलिस महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. युपीएससीने तीन अधिकाऱ्यांची लिस्ट या पदासाठी तयार केली होती. त्यातील भवरा यांच्या नावाला चन्नी सरकारने अनुमती दिली. दिनकर दत्ता आणि प्रबोधकुमार हे या यादीतील अन्य दोन अधिकारी होते.
भवरा यांची नियुक्ती दोन वर्षांसाठी असेल. सध्या सिद्धार्थ चट्टोपाध्याय हे हंगामी पोलिस महासंचालक म्हणून काम पहात आहेत. पंजाबात पोलिस महासंचालकांच्या नियुक्तीबाबत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिद्धु आणि मुख्यमंत्री चन्नी यांच्यात जोरदार संघर्ष झाला होता. आधीच्या पोलिस महासंचालकांना केवळ सिद्धुंच्या आग्रहामुळे बदलावे लागले होते. या नियुक्तीचे राजकारण बरेच रंगले होते.