नवी दिल्ली – मदर टेरेसा यांनी स्थापन केलेल्या मिशनरीज ऑफ चॅरीटी या संस्थेचा रद्द केलेला एफसीआरए परवाना गृहमंत्रालयाने पुन्हा कायम केल्याच्या बातमीच्या आधारे तृणमुल कॉंग्रेसचे राज्यसभेतील नेते डेरक ओब्रियन यांनी मोदी सरकारवर खोचक निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, प्रेमाची शक्ती ही 56 इंची छातीच्या शक्तीपेक्षा खूपच अधिक असते. या निमीत्ताने त्यांनी थेट मोदींवरच निशाणा साधला आहे.
मदर टेरेसा यांच्या संस्थेचेच एफसीआरए रजिस्ट्रेशन मोदी सरकारने रद्द केल्याने त्याची देशभरातून अत्यंत विपरीत प्रतिक्रीया आली होती. तृणमुल कॉंग्रेस पक्षाने सुद्धा या निर्णयावर सडकून टीका करीत हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केंद्र सरकारकडे केली होती. या मिशनरी संस्थेतर्फे गरीब व गरजुंवर उपचार केले जातात तसेच त्यांची अन्यही मदत केली जाते. ही संस्था अनेकांसाठी आश्रयदाती संस्था ठरली आहे. संस्थेचे काम जगभर वाखाणले गेले आहे.