मटण, मासळी खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा
पिंपळे गुरव – एकीकडे करोनाचे संकट उभे ठाकले आहे, त्यात शहराच्या कोणत्यातरी भागात रुग्ण आढळतो. त्यामुळे लॉकडाऊन पण दापोडी परिसरातील भाजी मंडई व चिकण, मटण दुकानात “नो सोशल डिस्टंन्सिगश’ अशी स्थिती आहे. शासकीय आदेशाचे पालन करा आणि “सोशल डिस्टन्सिग’ ठेवा असे आवाहन करण्यात येत असताना ही नागरिक गांभिर्याने घेत नसल्याची बाब उघड झाली आहे.
करोनाचे संकट वाढत आहे. त्यामुळे देशात तिसऱ्यांदा लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सोमवारपासून (दि. 4) सुरू होत आहे. मात्र नागरिक करोनाच्या पार्श्वभूमीवर घालून देण्यात आलेले नियम धाब्यावर बसवत आहेत. त्यामुळे करोनाचा धोका भविष्यात अधिक वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. राज्यात संचारबंदी, लॉकडाऊन आहे. परंतु काही नागरिक नियमाची पायमल्ली करीत असल्याचे चित्र दिसत आहे.
रविवारी (दि. 3) बहुतेक नागरिक मटण आणि मासळी घेण्यासाठी शहरातील दापोडी मोठ्या प्रमाणात परिसरात गर्दी करताना दिसून येत आहे. करोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या पाहता शासनाचे पूर्ण पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर हे रेडझोन केले आहे; मात्र याकडे दापोडीकरांचे लक्ष दिसत नाही.
दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी एकाच दिवसात दोन बाधितांची नोंद आहे. शहरात करोनाचे 115 रुग्ण झाले आहेत. मात्र असे असताना सोशल डिस्टन्सिंगचे भान नागरिकांमध्ये दिसत नाही, अशी परिस्थिती आहे. लॉकडाऊन 17 मेपर्यंत वाढल्यानंतर दापोडीतील रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या चिकण- मासळी मार्केट दुकानांपुढे नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गर्दी मोठ्या प्रमाणात असल्याने सोशल डिस्टनसिंगचे तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आहे
गेल्या महिन्यात दापोडी परिसरात रुग्ण आढळले. त्यानंतर पिंपळे गुरव आणि शनिवारी ही अशीच स्थिती पाहवयास मिळाली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन नाही केले, तर काय होईल याचे भान ठेवले पाहिजे. यावर पालिका प्रशासन व पोलिसांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे, असाही मतप्रवाह पाहवयास मिळतो.