- 457 रुग्णांची नोंद – 19 रुग्णांचा मृत्यू
- आज केवळ सहाच रुग्णांना डिस्चार्ज
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील दररोजची करोनाबाधित रुग्णसंख्या सोमवारी पाचशेपेक्षा कमी झाली आहे. शहरामध्ये आज 457 नवीन रुग्णांची भर पडली. गेल्या दोन महिन्यांनंतर करोनाचा कहर आता ओसरताना दिसत आहे. दोन महिन्यांनंतर पहिल्यांदाच शहरातील रोजची रुग्णवाढ पाचशेपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. शहरात आजपर्यंत 80 हजार 923 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर आजपर्यंत 1897 जणांचा मृत्यू झाला आहे.
महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, आज चार वाजेपर्यंत शहरातील 443 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 14 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 24 तासांमध्ये 18 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 13 व शहराबाहेरील 5 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरात 80,923 रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील महापालिकेचे रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सद्यस्थितीत शहरात 4054 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 603 रुग्णांचाही समावेश आहे.
सोमवारी दिवसभरात शहरात 18 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. शहरातील काळेवाडी, चिखली, खराळवाडी, किवळे, चिंचवड, थेरगाव, कासारवाडी, आकुर्डी, संत तुकारामनगर येथील 13 रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील पुरंदर, धावडी, पुणे, हिवरे, खेड येथील 5 जणांचा मृत्यू झाला.
आज दिवसभरात फक्त 6 रुग्णांना घऱी सोडण्यात आले. आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 74,504 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 3461 संशयित रुग्णांना महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 1209 रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.