- आंद्रा व भामा आसखेड पाणी योजनांबाबत निर्णय
पिंपरी – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाला सध्या गृहयोजनांसाठीच कोट्यावधी रूपयांची रक्कम खर्च करावी लागणार आहे. त्यामुळे आंद्रा व भामा आसखेड धरणातून शहरासाठी पाणी उचलण्याच्या योजनेसाठी निधीच्या उपलब्धतेनुसार 64 कोटी रुपयांची रक्कम देण्याबाबत निर्णय प्राधिकरणाच्या सभेत घेण्यात आला. तशा आशयाचा ठराव प्राधिकरण सभेत गुरूवारी मंजूर करण्यात आला.
आंद्रा व भामा आसखेड धरणातून शहराला पाणी उचलण्याच्या योजनेसाठी येणाऱ्या खर्चात प्राधिकरणाने देखील वाटा उचलावा, अशी भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली आहे. त्यासाठी प्राधिकरणाने 64 कोटी 73 लाख रूपये इतका खर्च उचलावा, असे पत्र आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहे. त्याला अनुसरून त्याबाबत धोरण ठरविण्याचा प्रस्ताव प्राधिकरण सभेसमोर मंजुरीसाठी होता. शहर हद्दीतील सर्व गावांना महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. संबंधित हद्दीत प्राधिकरणाचा भाग देखील समाविष्ट आहे. शहराची लोकसंख्या सध्या 27 लाखांपर्यंत जाऊन पोहचली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात शहराची पाण्याची मागणी वेगाने वाढत आहे.
महापालिकेतर्फे आंद्रा व भामा आसखेड धरणातून पाणी उचलण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. आंद्रा धरणातून पाणी उचलण्यासाठी सुमारे 115 कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर, भामा आसखेड धरणातून पाणी उचलण्यासाठी 160 कोटी रुपयांचा खर्च नियोजित आहे.
प्राधिकरण हद्दीतील सर्व रस्ते, विकासकामे प्राधिकरणाकडून करण्यात येतात. संबंधित विकासकामे झाल्यानंतर त्याचे महापालिकेकडे हस्तांतर केले जाते. त्यानंतर महापालिकेकडून देखभाल-दुरूस्तीची कामे केली जातात. तथापि, प्राधिकरणाकडून पाणीपुरवठ्याच्या योजना देखील राबविण्यात येत आहे. संबंधित योजना महापालिकेस हस्तांतर करणे अपेक्षित आहे. तथापि, पाणीपुरवठा योजनांचा भांडवली खर्च फक्त महानगरपालिका करीत आहे. पाण्याचा पुरवठा प्राधिकरणाच्या क्षेत्रात देखील केला जात आहे. त्यामुळे भांडवली खर्चाचा लोकसंख्येच्या प्रमाणात हिस्सा प्राधिकरणाने देणे आवश्यक आहे, अशी महापालिका प्रशासनाची भूमिका आहे.